राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांची टीका
‘हिंदुहृदयसम्राट’ बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने एखादी योजना सुरू करणे हे संविधानविरोधी आहे आणि राज्याचे घटनात्मक प्रमुख राज्यपालांच्या अभिभाषणात त्याचा उल्लेख व्हावा, ही बाब अत्यंत आक्षेपार्ह आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी बुधवारी विधान परिषदेत युती सरकारवर हल्ला केला.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाच्या ठरावावर बोलताना, तटकरे यांनी युती सरकारच्या वर्षभरातील कारभाराचा खरपूस समाचार घेतला. विशेषत मराठवाडय़ात पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले असताना, ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये व नगर परिषदांमध्ये केल्याची कारणे सांगून या सरकारने ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद करून टाकल्या असा आरोप त्यांनी केला. पाणी, अन्नधान्य आणि रोजगार नसल्यामुळे मराठवाडय़ातील लोक स्थलांतर करीत आहेत. अन्नसुरक्षा योजना ही आधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारची आहे, मात्र ही योजना सुरू केल्याचे भासवून युती सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

धर्मनिरपेक्षता तत्त्वाची पायमल्ली
बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सरकारने कितीही योजना सुरू कराव्यात, आमचा त्याला आक्षेप राहणार नाही, परंतु ‘हिंदूुहृदयसम्राट’ असा शब्द वापरणे ही घटनेतील धर्मनिरपेक्षता तत्त्वाची पायमल्ली आहे आणि त्याला आमचा विरोध राहील, असे तटकरे यांनी सांगितले. काही लोक श्रीमंत झालेत त्यांना आरक्षण नको, अशी विधाने करतात, त्यामुळे घटनेतील आरक्षणाबाबत संभ्रम निर्माण होत आहे. विष्णू सावरा, राजकुमार बडोले या मंत्र्यांची आरक्षण नाकारण्याची तयारी आहे का, असा सवाल तटकरे यांनी केला. त्यावर, केंद्र सरकारने घटनात्मक आरक्षण राहणार, असे संसदेत निवेदन केले आहे, त्यामुळे आरक्षणाबाबत कसलाही संभ्रम नाही, असा खुलासा संसदीय कार्यमंत्री प्रकाश मेहता यांनी केला.