मुंबई : ॲपआधारित कॅब लवकरात-लवकर आरक्षित (बुक) करण्यासाठी अनेकदा प्रवाशांना वाजवी भाड्याऐवजी जादा रक्कम मोजावी लागते. ठरावीक प्रवासाकरिता ॲपवर दाखविलेल्या दरात गाडी आरक्षित होत नसल्याने प्रवासी चालकांना आगाऊ बक्षिसी (टीप) देतात. मात्र, प्रवास पूर्ण झाल्यावरच चालकांना बक्षिसी देण्याचा पर्याय प्रवाशांना मिळावा, असे आदेश केंद्राने ॲग्रीगेटर कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळे चालक आणि ॲपआधारित कॅब ॲग्रीगेटर्सच्या या मनमानीला लगाम बसेल.

 रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व ॲप-आधारित राइड ॲग्रीगेटर्सना प्रवासापूर्वी किंवा प्रवासादरम्यान बक्षिसी देण्याच्या सूचना काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. अतिरिक्त पैसे दिल्यास सेवा सुधारेल, असा प्रवाशांचा गैरसमज होऊ शकतो, असे मंत्रालयाने आदेशात म्हटले आहे.  सध्या, बहुतेक सर्व प्रमुख ॲप-आधारित राईड ॲग्रीगेटर्स, राइड बुक करताना प्रवाशांना आगाऊ १० ते १०० रुपये देण्यास सांगतात. त्यामुळे राइड लवकर आरक्षित (कर्न्फम) होण्याची शक्यता असल्याचेदेखील सांगितले जाते. बहुतेक ॲग्रीगेटर कंपन्यांनी २०२० मध्ये ॲप-मधील टिपिंगची (राइडच्या आधी किंवा दरम्यान) सुविधा सुरू केली. चालक अनेकदा अशाच राईड्स स्वीकारण्यास प्राधान्य देतात. याबाबत आरटीओकडे प्रवाशांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

तक्रारींची दखल

प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेत, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ११ ऑगस्ट रोजी आदेश दिले आहेत. त्यात राइड हेलिंग ॲप्सवरील ‘ॲडव्हान्स टीप’, ‘ॲड-ऑन निवडा’, आणि ‘राइड कन्फर्मेशन लवकर मिळण्याची शक्यता वाढवा’ यांसारखे संदेश प्रवाशांवर अतिरिक्त पैसे भरण्यासाठी दबाव आणतात. त्यामुळे या सूचना काढून काढण्याचे आदेश मंत्रालयाने कॅब कंपन्यांना दिले आहेत. प्रवाशांनी अतिरिक्त बक्षिसी म्हणून दिलेली संपूर्ण रक्कम चालकालाच मिळाली पाहिजे, असे निर्देशात म्हटले आहे.