मुंबई : ॲप आधारित रिक्षा, कॅब, टॅक्सी चालकांनी संपूर्ण राज्यभरात शनिवारी पुकारलेल्या एक दिवसीय बंदला उत्स्फूर्त पाठींबा दिला. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर या प्रमुख शहरांसह ग्रामीण भागातही बंदचा मोठ्या प्रमाणावर परिणाम दिसून आला. या बंदमुळे अनेक ठिकाणी ७० ते ८० टक्के कॅब व रिक्षा रस्त्यावर उतरल्या नाहीत. परिणामी, प्रवासी वाहतुकीवर लक्षणीय परिणाम झाला.
संपूर्ण देशात सुरू असलेल्या बेकायदा बाइक टॅक्सी सेवा, तसेच ओला, उबर व रॅपिडो कंपन्यांच्या मनमानी भाडे आकारणी धोरणाविरोधात शनिवारी राज्यातील सर्व ओला, उबर, रॅपिडो कॅब व रिक्षा चालकांनी देशव्यापी एकदिवसीय बंद पुकारला होता. बंदमुळे ॲप आधारित वाहनांची तीव्र कमतरता भासली. बंद दरम्यान अनेक ठिकाणी अत्यंत मर्यादित प्रमाणात उपलब्ध असलेल्या कॅब सेवांचे भाडे नेहमीपेक्षा तीन ते चार पटीने अधिक आकारल्याचे निदर्शनास आले. वाहनांची अनुपलब्धता आणि अवाजवी दरांमुळे प्रवाशांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. यामुळे बंदचा प्रत्यक्ष आणि व्यापक परिणाम समोर आला.
राज्यभरात अत्यल्प प्रमाणात उपलब्ध असलेल्या कॅब सेवांचे भाडे तीन ते चार पट वाढल्याचे निदर्शनास आले. यावरून कॅब-रिक्षा चालकांचा बंद पूर्णतः यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाले. चालकांशिवाय ॲप-आधारित कंपन्या चालू शकत नाहीत आणि अशा परिस्थितीत प्रवाशांवर अन्यायकारक दर लादले जातात, हे या बंदामुळे उघड झाले. चालकांनी पुकारलेला बंद यशस्वी होणे हे सरकार व ॲप-आधारित कंपन्यांकडून कॅब व रिक्षा चालकांवर होत असलेल्या अन्यायकारक धोरणांविरोधातील तीव्र असंतोषाचे ज्वलंत उदाहरण आहे, अशी माहिती भारतीय गिग कामगार मंचाने दिली.
ओला, उबर आणि रॅपिडो यासारख्या ॲप-आधारित कंपन्यांकडून परिवहन विभागाच्या सूचनांचे आणि नियमांचे सर्रास उल्लंघन, निर्धारित भाडे रचना, परवाना अटी, विमा, प्रवासी सुरक्षा आणि कायदेशीर जबाबदाऱ्या याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून या कंपन्या एकीकडे चालकांचे आर्थिक शोषण करत आहेत. तर दुसरीकडे प्रवाशांकडून अवाजवी भाडे उकळून त्यांचीही फसवणूक करत आहेत. या बेकायदे आणि मनमानी कारभारावर शासनाकडून कारवाई करण्यात येत नसल्याने हा देशव्यापी बंद पुकारण्यात आला होता. तसेच बाइक टॅक्सीलाही कडाडून विरोध दर्शविण्यात आला.
राज्यभरात सुमारे १८ लाख ॲप आधारित वाहने असून या वाहनांमुळे १८ लाखांहून अधिक चालकांचे घर चालते. सुरुवातीच्या काळात ॲप आधारित वाहन चालकांना अनेक प्रलोभने दाखविण्यात आली. परंतु मोबादल्याचा परतावा, उत्पन्नातील घट कमी होऊ लागल्याने चालकांची पिळवणूक होऊ लागली. याबाबत अनेकदा मागणी करून देखील मोबादल्यात वाढ करण्यात आली नाही. तसेच कोणतीही स्पष्ट कायदेशीर चौकट, परवाना नियम, प्रवासी सुरक्षेची हमी किंवा विमा व्यवस्था नसताना बाइक टॅक्सीला प्रोत्साहन देण्यात आले. त्यामुळे बाइक टॅक्सीबाबत स्पष्ट आणि कठोर धोरण होईपर्यंत अशा सेवांना परवानगी देऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
