मुंबई : ॲप-आधारित टॅक्सी बुक करताना चालकांकडून केल्या जाणाऱ्या अतिरिक्त टिपच्या मागणीवर केंद्र आणि राज्य सरकारने कठोर कायदेशीर बंधने घातली असली तरी आजही प्रवाशांकडून सर्रास टीप मागितली जाते. त्यामुळे ॲप-आधारित टॅक्सी सेवांमधील चालकांच्या मनमानीमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. राइड स्वीकारल्यानंतर वाहन अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर आलेले असतानाच चालकांकडून १०० ते १५० रुपयांच्या अतिरिक्त ‘टिप’ची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ओला, उबर, रॅपिडोसारख्या ॲप-आधारित सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांकडून अतिरिक्त पैशांच्या मागणीबाबत सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. विमानतळ, रेल्वे स्थानके, व्यापारी केंद्रे तसेच गर्दीच्या वेळांमध्ये चालक प्रवाशांशी संपर्क साधून ॲपवर दाखवलेल्या भाड्या व्यतिरिक्त रक्कम मागतात. अतिरिक्त पैसे न मिळाल्यास राइड रद्द करून चालक दुसऱ्या प्रवाशाचा शोध घेत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते. परिणामी नाईलाजास्तव प्रवाशांना टीप द्यावी लागते.

ॲप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि ई-बाईक टॅक्सी या वाहतूक सेवांमध्ये पारदर्शकता, शिस्त आणि प्रवासी सुरक्षेसाठी राज्य सरकारने तयार केलेली ‘महाराष्ट्र मोटार वाहन ॲग्रीगेटर नियम, २०२५’ ही नियमावली तयार केली आहे. मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम ७३, ७४ आणि ९३ अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या नियमावलीत प्रवासी आणि चालकांच्या हक्कांसह ॲग्रीगेटर कंपन्यांच्या जबाबदाऱ्याही निश्चित केल्या आहेत. मात्र चालकांच्या मनमानीवर अदयाप अंकुश ठेवण्यात परिवहन विभागाला यश आलेले नाही. राज्यात ॲग्रीगेटर नियमावलीची अंमलबजावणी झाल्यास अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकते, असे मत प्रवासी संघटनांकडून व्यक्त होत आहे.

राइड स्वीकारल्यानंतर चालकांनी अटी बदलणे ही प्रवाशांची सरळ-सरळ फसवणूक आहे. तक्रार करूनही अनेकदा ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो- अरुण भालचंद्र,प्रवासी,ठाणे

गेल्या आठवड्यात नेरुळ ते दादर प्रवासाकरिता ॲप-आधारित टॅक्सी बुक केली. बराच वेळ गाडी बुक होत नव्हती. आधी ५० नंतर १०० रुपये टीप चालकाने मागितली.त्यास होकार दिल्यानंतर गाडी बुक झाली-शेखर मोहिते,प्रवासी,नेरुळ