मुंबई: मुंबई, मुंबई महानगर प्रदेशात आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक व्यवस्था विकसित करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) १४ मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यानुसार मेट्रो प्रकल्पांच्या कामाला गती देण्यासाठी बळ देण्यासाठी सोमवारी १२ हजार कोटींहून अधिक किमतीच्या कामांच्या कंत्राटांना मान्यता देण्यात आली. एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीच्या २८४ व्या आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत १९ कामांची कंत्राट मंजूर करण्यात आली. त्यात अटल सेतूच्या काही कामांच्या कंत्राटाचाही समावेश आहे.

सोमवारच्या एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत प्रणाली, रोलिंग स्टाॅक, कारशेडची कामे यासह इतर कामांचे १९ प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. हे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. त्यानुसार मेट्रो ४ आणि ४ अ (वडाळा-ठाणे-कासारवडवली-गायमुख) मार्गिकेतील एकात्मिक प्रणाली, रोलिंग स्टाॅक, दूरसंचार, फलाटावरील दरवाजे, कारशेडमधील उपकरणांचा पुरवठा आणि उपकरणांच्या ५ वर्षाच्या देखभालीचे कंत्राट एल अँड टी ला देण्यात आले आहे. सुमारे ४,७८८ कोटी रुपयांचे कंत्राट आहे. मेट्रो ४ अ (कासारवडवली-गायमुख) मार्गिकेतील गव्हाणपाडा आणि गायमुख स्थानकांतील स्थापत्य कामांसाठी सुधारीत संरचना आणि इतर बदलांसाठीचे ५५.५५ कोटींचे कंत्राटही मंजूर करण्यात आले आहे. मेट्रो ४ (वडाळा-कासारवडवली) मार्गिकेतील भक्ती पार्क ते मुलुंड अग्निशमन केंद्र दरम्यान रुळांच्या कामासाठीचे कंत्राट एल अँड टीला देण्यात आले आहे. हे कंत्राट १८८.५९ कोटी रुपयांचे असून १५.७२ टक्के कमी दराने हे कंत्राट मंजूर करण्यात आले आहे. मेट्रो ६ (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी) मार्गिकेतील स्वामी समर्थनगर ते पूर्व द्रुतगती मार्गासाठी वीज पुरवठा, ट्रॅक्शन, उद्वाहक आणि सरकत्या जिने बसविण्यासह त्यांच्या ५ वर्षाच्या देखभालीचे कंत्राट इरकाॅन इंटरनॅशनल लिमिटेडला देण्यात आले आहे. हे कंत्राट ६६८.१५ कोटी रुपयांचे आहे. अटल सेतू प्रकल्पातील आयटीएस प्रणाली, पथकर व्यवस्थापन, प्रगत वाहतूक नियंत्रम प्रणाली, पथदीवे आणि आदी कामांसाठीचे ५५.४१ कोटी रुपयांचे कंत्राट मंजूर करण्यात आले आहे. मेट्रो ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) मार्गिकेतील रोलिंग स्टाॅक, सिग्नल यंत्रणा, कारशेडमधील विविध यंत्रणांचा पुरवठा आणि त्यांची स्थापना, देखभाल यासाठीचे २,२६८.६६ कोटी रुपयांचे कंत्राट एनसीसी लिमिटेडला देण्यात आले आहे. मेट्रो ६ (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी) मार्गिकेसाठीच्या सल्लागारास ६८० दिवसांच्या मुदतवाढीसह ३९.६१ टक्के खर्चवाढीसही मान्यता देण्यात आली. यासंबंधीचा प्रस्ताव १०४.६६ कोटी रुपयांचा होता. मेट्रो ४, ४अ मार्गिकेतील ३१ स्थानकांवरील मल्टिमोडल इंटिग्रेशनच्या कामाचे ५३५.०८ कोटींचे कंत्राट मंजूर करण्यात आले असून हे कंत्राट चार टप्प्यात देण्यात आले आहे. एन.ए. कन्स्ट्रक्शन-जे कुमार (संयुक्त), देव इंजिनियरिंग, एन.ए. कन्स्ट्रक्शनआणि एन. ए. कन्स्ट्रक्शन-एसएआरई (संयुक्त) या कंपन्यांना ही कामे देण्यात आली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेट्रो २ अ (दहिसर ते अंधेरी पश्चिम) मार्गिकेसाठी डीएमआरसीला अतिरिक्त सल्लागार म्हणून वाढीव कालावधीसाठीचे ४३२.६३ कोटी रुपयांचे शुल्क मंजूर करण्यात आले आहे. मेट्रो ९ (दहिसर-भाईंदर) आणि ७ अ (गुंदवली-विमानतळ) मार्गिकेतील विद्युत वितरणासह अन्य कामाचे ११८.२८ कोटी रुपयांचे कंत्राट लीना पाॅवरटेक-उमेश ब्रदर्स (संयुक्त) यांना देण्यात आले आहे. मेट्रो ४,४ अ मार्गिकेतील एएफसी प्रणालीचे २४९.९७ कोटी रुपयांचे कंत्राटही यावेळी मंजूर करण्यात आले. मेट्रो ५ मार्गिकेतील कशेळी कारशेडमध्ये विविध सुविधांच्या पाच वर्षाच्या देखभालीचे कंत्राट इरकाॅन इंटरनॅशनल कंपनीला देण्यात आले असून हे कंत्राट ४९७.४६ कोटी रुपयांचे आहे. यासह अन्य मेट्रोशी संबंधित अन्य कामांसाठीचीही कंत्राटे अंतिम करण्यात आली आहे. १२ हजार कोटींहून अधिकची कामे आता मार्गी लागणार असल्याने मेट्रोच्या कामांना गती मिळेल असा विश्वास महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी व्यक्त केला.