शासकीय रुग्णालयांतील ५ हजार पदांच्या कंत्राटी भरतीला मान्यता, महत्त्वाच्या तांत्रिक पदांचा समावेश

राज्यातील २७ वैद्यकीय, आयुर्वेद व होमियोपॅथिक महाविद्यालये व त्यांच्याशी सलग्न रुग्णालयांतील ५ हजार पदे बाह्यस्रोतामार्फत भरण्यास मान्यता दिलेली आहे.

mantralay
संग्रहित छायाचित्र

मधू कांबळे

मुंबई : राज्य शासनाने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च कमी करण्याच्या हेतूने आरोग्य सेवेसारख्या महत्त्वाच्या सेवेतील गट क व गट ड संवर्गातील पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार राज्यातील २७ वैद्यकीय, आयुर्वेद व होमियोपॅथिक महाविद्यालये व त्यांच्याशी सलग्न रुग्णालयांतील ५ हजार पदे बाह्यस्रोतामार्फत भरण्यास मान्यता दिलेली आहे. त्यात आरोग्य सेवेशी संबंधित महत्त्वाच्या तांत्रिक पदांचा समावेश आहे.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी या मागणीसाठी ज्या दिवशी बेमुदत संप पुकारला त्याच दिवशी म्हणजे १४ मार्चला राज्य शासनाने शासकीय, निमशासकीय कार्यालयांत बाह्यस्रोतांमार्फत नोकरभरती करण्याचा आदेश जारी केला. त्यासाठी नऊ कंपन्यांच्या नियुक्तीस मान्यता दिली. त्याचे तीव्र पडसाद विधिमंडळ अधिवेशनात उमटले. विरोधी पक्षांनी शासकीय सेवेतील नोकऱ्यांच्या खासगीकरणास विरोध केला, तर हा निर्णय आधीच्या महाविकास आघाडी सरकारचा असल्याचा दावा करीत सत्ताधारी पक्षाकडून कंत्राटी नोकरभरतीचे समर्थन करण्यात आले. राज्य शासनाने कर्मचारी संघटनांनी संप पुकारला त्याच दिवशी नऊ खासगी कंपन्यांना मनुष्यबळ पुरवठा करण्यास मान्यता दिली असली, तरी त्या आधी दीड महिन्यांपूर्वी राज्यातील २७ वैद्यकीय, आयुर्वेद, हौमियोपॅथिक महाविद्यालये व त्यांच्याशी संलग्न रुग्णांलयातील गट क व गट ड संवर्गातील ५ हजार ५६ पदे बाह्यस्रोतांमार्फत भरण्यास संमती दिली आहे. त्यासाठी येणाऱ्या १०९ कोटी ५२ लाख रुपये खर्चसही मंजुरी देण्यात आली आहे.

खर्च कपातीचे उद्दिष्ट

 या कंत्राटी भरतीमागे २० ते ३० टक्के वेतनावरील खर्चकपातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या आदेशानुसार १२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व त्यांच्याशी सलग्न १५ रुग्णालयांतील कंत्राटी नोकरभरतीला मान्यता देण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने राज्यात नव्याने सुरू करण्यात आलेल्या चंद्रपूर, गोंदिया, जळगाव, नंदूरबार, सातारा, उस्मानाबाद, बारामती, अलिबाग, सिंधुदुर्ग, येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांचा समावेश आहे. या पदांमध्ये शिपाई, सफाई कामगार, सुरक्षारक्षक, प्लंबर, वीजतंत्री, दूरध्वनीचालक, यांबरेबरच लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, आरोग्य निरीक्षक, शस्त्रक्रियागृह सहाय्यक, दंततंत्रज्ञ, रक्तपेढी सहाय्यक, एमआरआय. ईसीजी, इंटोस्कोपी तंत्रज्ञ, निर्जुतीकरण, क्षकिरण तंत्रज्ञ, इत्यादी वैद्यकीय सेवेशीसंबंधित तांत्रिक पदांचा समावेश आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 00:26 IST
Next Story
नालेसफाईच्या कामांना सुरुवात ; ८० टक्के गाळ पावसाळ्याआधी काढणार; नालेसफाईचा डॅशबोर्ड यंदाही कार्यान्वित करणार
Exit mobile version