सेवाग्रामच्या २४४ कोटींच्या विकास आराखडय़ास मान्यता; ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी एक अनुभूती’ हा नवीन उपक्रम

सेवाग्राम विकास आराखडय़ांतर्गत करण्यात येत असलेल्या कामांसाठी ८१.५७  कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी या वेळी मंजूर करण्यात आला.

mahatma gandhi image

मुंबई: गांधीजींचे अर्थव्यवस्था, धर्म, जाती, लिंग यासंबंधीचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी एक अनुभूती’ हा नवीन उपक्रम सुरू करतानाच सेवाग्रामच्या २४४ कोटींच्या सुधारित विकास आराखडय़ास मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.   

सेवाग्राम विकास आराखडय़ांतर्गत करण्यात येत असलेल्या कामांसाठी ८१.५७  कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी या वेळी मंजूर करण्यात आला. तसेच जिल्हा वार्षिक योजनेच्या सूत्रानुसार देय ठरणाऱ्या निधीव्यतिरिक्त आणखी रुपये १० कोटींचा अतिरिक्त निधी सेवाग्राम विकास आराखडय़ाअंतर्गत करण्यात आलेल्या कामाच्या संवर्धनासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. सेवाग्राम विकास आराखडय़ाअंतर्गत करावयाची कामे ही वेळेत पूर्ण व्हावीत तसेच त्या कामांचा दर्जा उत्कृष्ट राहील याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचना या वेळी ठाकरे यांनी दिल्या.   

  बैठकीत राष्ट्रपिता महात्मा गांधी एक अनुभूती हा नवीन उपक्रम राबविण्यासदेखील मान्यता देण्यात आली. या नवीन उपक्रमासाठी ३९ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यामध्ये विविध नावीन्यपूर्ण कामांचा समावेश करण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये ग्रंथालय आणि रिसोर्स सेंटर, गांधी विचार आणि प्रतिमा: हेरिटेज ट्रेलचा विस्तार, अभ्यागत केंद्राच्या ठिकाणी इंटरअ‍ॅक्टिव्ह प्रदर्शन- ३ डी इमेजिंग, मल्टी मीडिया तंत्रज्ञानाचा वापर करून अर्थव्यवस्था, धर्म, जाती, लिंग यासंबंधीचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

 वर्धा रेल्वे स्थानक परिसरातील जुन्या रेल्वे कोचच्या आसपास दक्षिण अफ्रिकेतील निवासाबाबत कलाकृती, प्रदर्शन आणि नवीन लँडस्केपचे निर्माण केले जाणार आहे. सेवाग्राम आश्रम परिसरातील हेरिटेज पोस्ट ऑफिसचा वारसा जतन करून तिथे तिकीट संग्रहालय प्रदर्शन आयोजित करण्यात येईल.  याशिवाय या परिसरातील तलाव, बागांच्या विकासाची कामेही  हाती घेण्यात येणार आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Approval sevagram development plan father of the nation mahatma gandhi new venture ysh

Next Story
गडचिरोलीत सुसज्ज रुग्णालय; विमानतळाच्या कामाला गती देण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश
फोटो गॅलरी