मुंबई: भाडेवाढ करुनही रिक्षा, टॅक्सी चालकांकडून मुंबईत भाड्यास नकार देणे, प्रवाशांबरोबर उद्धट वर्तन करणे असे प्रकार सुरुच आहेत. आरटीओकडे करण्यात येणाऱ्या तक्रारी किंवा विशेष मोहिमेद्वारे करण्यात येणाऱ्या कारवाईदरम्यान असे प्रकार सर्रास घडत असल्याचे उघडकीस येत आहे. बोरिवली, अंधेरी आरटीओच्या हद्दीत अशा चालकांविरुद्ध सर्वाधिक कारवाया करण्यात येत आहेत.

सध्या रिक्षाचे किमान भाडे २१ रुपये असून यापूर्वी ते १८ रुपये होते. तर सध्या टॅक्सीचे भाडे २५ रुपये असून पूर्वी ते २२ रुपये होते. गेल्या वर्षी मार्च महिन्यात ही वाढ दिली. करोनाकाळात उत्पन्न कमी होत होते.प्रवासी कमी असल्याने रिक्षा, टॅक्सी चालक प्रवाशांना या सेवांचा लाभ घेण्यासाठी आतोनात प्रयत्न करत होते. रुग्णसंख्या कमी झाली आणि निर्बंधहीशिथिल झाले. त्यानंतर रिक्षा, टॅक्सींना प्रवासी मिळू लागले. आता प्रवासी मिळत असतानाही रिक्षा, टॅक्सीचालक आपल्या मनासारखे भाडे मिळवण्यासाठी जवळचे भाडे नाकारत असल्याचे निदर्शनास आले आहे.

बोरिवली आरटीओतंर्गत जानेवारी ते जून २०२२ या कालावधीत रिक्षा चालकांविरोधात केलेल्या कारवाईत ३४६ जण दोषी आढळले आहेत. भाडे नाकारल्याप्रकरणी १७ कारवाया आणि उद्धट वर्तना केल्याप्रकरणी तिघांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच जादा भाडे आणि मीटर जलद केल्याबद्दल ११ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. चालकांचे लायसन्स (अनुज्ञप्ती) किंवा बॅज नसल्याचेही निदर्शनास आले आहे. यासह विविध २७१ प्रकरणांमद्ये कारवाई करण्यात आली आहे. अंधेरी आरटीओ हद्दीतही रिक्षा तसेच टॅक्सीचालकांचा मनमानी कारभार सुरुच असून त्याचेप्रमाण अधिक आहे. अंधेरीतील निवासी वस्त्यांसोबतच खासगी कार्यालयांची संख्याही अधिक आहे. अंधेरी आरटीओच्या हद्दीत रिक्षांची संख्या अधिक असतानाच काही प्रमाणात टॅक्सीही आहेत. गेल्या सहा महिन्यात या परिसरात भाडे नाकारल्याबाबत ५१ तर उद्धट वर्तन केल्याबाबत ५२ प्रकरणांमध्ये आरटीओने कारवाई केली आहे. त्या तुलनेने वडाळा आरटीओंतर्गत कमी प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. फक्त उद्धट वर्तनाविरोधातच कारवाई झाली असून २३ रिक्षाचालकांविरोधात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

कारवाई काय

वडाळा आरटीओ- चालकांवर दंडात्मक कारवाई, २७ हजार रुपये दंड वसूल आणि आठ चालकांचे लायसन्स निलंबित केले.

बोरिवली आरटीओ- ३४६ चालक दोषी आढळले असून पाच वाहने जप्त करण्यात आलीआहेत. तर १२ जणांचे लायसन्स निलंबित करण्यात आले असून उर्वरित चालकांवर दंडात्मक कारवाई करून ९३ हजार ६५० रुपये दंड वसूल करण्यात आला.

अंधेरी आरटीओ – ६२ तक्रारी प्राप्त झाल्यानंतर यापैकी २६ चालकांचे लायसन्स निलंबित करण्यात आले आहे. तर उर्वरित चालकांवर दंडात्मक कारवाईकरून १ लाख १८ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला.