महाराष्ट्रदिनी भाजपातर्फे मुंबईत पोलखोल अभियानाचा शेवट करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या बुस्टर डोस सभेचं आयोजन करण्यात आले आहे. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा केल्यानंतर त्यांना अटक करण्याता आली आहे. यावरुन देवेंद्र फडणवीसांनी यावेळी मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका केली आहे.

“आता महाराष्ट्रामध्ये हनुमान चालिसा म्हटली तर राजद्रोह होतो. राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणणार असल्याचे सांगितले होते. त्यांनी मला आधी सांगितले असते तर त्यांना मी माजी मुख्यमंत्री म्हणून माझ्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणायला सांगितले असते. पण त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा लावण्यात आला. आरोपपत्रात त्यांनी हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा केल्याने ते राज्य उलथून टाकत होते म्हणून त्यांना जेलमध्ये टाकले असे म्हटले आहे. पण हनुमान चालिसा म्हटल्याने रामाचे राज्य उलथवले जाईल की रावणाचे? आरोप करणाऱ्यांनी तुम्ही रामाच्या बाजूचे की रावणाच्या बाजूचे एकदा सांगून टाका,” असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

“काश्मिरमध्ये आम्ही मेहबुबा मुफ्तींसोबत गेल्याचे म्हटले जाते. हो आम्ही गेलो कारण त्यावेळी आवश्यकता होती. पाकिस्तानने निवडणुका घेऊ शकत नाही असे म्हटल्यानंतर आमच्या सरकारने निवडणुका घेऊन दाखवल्या. ६० टक्के मतदान झाले. त्यावेळी आम्ही मुफ्तींसोबत काश्मिरमध्ये सरकार तयार केले आणि पाकिस्तानला इशारा दिला. ज्या क्षणी हे काम झाले त्यावेळी सत्तेला लाथ मारून मेहबुबा मुफ्तींना खाली खेचण्याचे काम भाजपाने केले. पंतप्रधान मोदींनी ठणकावून सांगितले की कलमी ३७० काढण्यात येईल,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.