मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीतातील पाच वेगवेगळ्या घराण्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ३० कलाकारांची एकत्र भव्य ऐतिहासिक स्वरमैफल रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. ‘अर्घ्य इंडियन क्लासिकल म्युझिक अँड फाईन आर्ट फाउंडेशन’ या संस्थेच्या वतीने या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले असून २२ मार्च २०२६ रोजी ‘अर्घ्य २०२६’ ही अनोखी स्वरमैफल रंगणार आहे.

भारतीय शास्त्रीय संगीतातील गुरु शिष्य परंपरेला अधिक बळकटी देणारी ‘अर्घ्य २०२६’ ही स्वरमैफल रविवार, २२ मार्च २०२६ रोजी वांद्रे येथील प्रतिष्ठित बालगंधर्व रंगमंदिर येथे संध्याकाळी ६:३० वाजता होणार आहे. या मैफिलीत शास्त्रीय संगीतातील पाच वेगवेगळ्या घराण्यांचे प्रतिनिधीत्व करणारे ३० कलाकार एकाच वेळी कला सादरीकरण करणार आहेत.

या ऐतिहासिक मैफिलीत सतारचे जादूगार पंडित रवी चारी आणि त्यांचे शिष्य; प्रख्यात गायक पंडित राम देशपांडे आणि त्यांचे शिष्य; बासरीवादक पंडित रूपक कुलकर्णी आणि त्यांचे शिष्य; तबलामहर्षी पंडित योगेश साम्सी आणि त्यांचे शिष्य, तसेच पखवाजवादक कृष्णा साळुंके आणि त्यांचे शिष्य यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला पद्मश्री तालयोगी पंडित सुरेश तळवलकर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

‘ही अस्सल स्वरमैफल पवित्र गुरू शिष्य परंपरेला अधिक बळकटी देणारी ठरणार असून गुरू आणि शिष्य एकाच व्यासपीठावर एकत्र सादरीकरण करणार आहेत. त्यातून ज्ञानसंक्रमणाची आणि कलात्मक वारशाची अखंडित परंपरा अधोरेखित होणार आहे. शास्त्रीय संगीताचा अस्सलपणा टिकवून ती भव्य आणि खिळवून ठेवणाऱ्या स्वरूपात नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे’ असे अर्घ्य फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले. या कार्यक्रमाची तिकिटे बुक माय शोवर उपलब्ध आहेत.