मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून १ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत राज्यव्यापी ‘आरोग्य संवाद यात्रा’ राबविण्यात येणार आहे. या यात्रेद्वारे आरोग्यमंत्री थेट नागरिकांशी संवाद साधून सरकारी आरोग्य सेवांची सद्यस्थिती जाणून घेणार आहेत. आरोग्य योजनांचा लाभ, रुग्णालयांमधील उपलब्ध सुविधा, औषधांचा पुरवठा आणि मनुष्यबळाच्या समस्यांचा आढावा घेऊन आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे.

राज्यातील आरोग्य सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतात की नाही, हे तपासण्यासाठी या यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि दोन ग्रामीण रुग्णालयांच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील सुविधांचा आढावा घेतला जाणार आहे. याशिवाय आरोग्य उपकेंद्रे, जिल्हा रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालये, मनोरुग्णालये आणि विशेष रुग्णालयांमधील सेवांचीही तपासणी केली जाणार आहे. रुग्णांना उपचार घेताना येणाऱ्या अडचणी, उपलब्ध वैद्यकीय सुविधा आणि आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटी यांची माहिती या माध्यमातून संकलित केली जाईल. यात्रेदरम्यान प्राप्त होणाऱ्या सूचना आणि अभिप्रायांचा आढावा घेण्यासाठी ५ डिसेंबरनंतर राज्यस्तरीय बैठक आयोजित केली जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मुंबईत राज्यस्तरीय आरोग्य समिती सदस्यांची बैठक घेण्याचे नियोजन आहे.

लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या सूचनांना प्राधान्य

आरोग्य व्यवस्थेतील सुधारणांसाठी लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने जिल्हा, तालुका, महापालिका आणि ग्रामस्तरावरील आरोग्य समित्यांच्या बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. या बैठकांना स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असून, आरोग्य संस्थांमधील पायाभूत सुविधा, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपलब्धता, औषधांचा पुरवठा आणि रुग्णसेवेतील अडचणी याबाबत चर्चा केली जाणार आहे. नागरिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सूचना मागवून स्थानिक पातळीवरील प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

विविध आरोग्य योजनांची माहिती जनतेपर्यंत

राज्य आणि केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविणे, हादेखील या यात्रेचा महत्त्वाचा उद्देश आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, मोफत डायलिसिस, एमआरआय व सीटी स्कॅन, स्टेमी उपचार, टेलिमेडिसिन, मोफत रक्त तपासण्या, १०२ व १०८ रुग्णवाहिका सेवा, जननी सुरक्षा योजना, माहेरघर आणि मानसिक आरोग्य समुपदेशन अशा सुविधांची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे. संबंधित अधिकारी योजनांबाबतच्या प्रश्नांची उत्तरे देऊन पात्र रुग्णांना आवश्यक मार्गदर्शन करतील.

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानालाही जोड

आरोग्य संवाद यात्रेची सांगड ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाशी घालण्यात येणार आहे. गावांमध्ये स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, पोषण, सांडपाणी व्यवस्थापन, संसर्गजन्य आजारांचे नियंत्रण आणि आरोग्यदायी जीवनशैली याबाबत जनजागृती केली जाणार आहे. आजारांवर उपचार करण्याबरोबरच ते होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.