बेकायदा ‘सीडीआर’ प्राप्त करणाऱ्यांची धरपकड

व्यक्तिगत तपशील गोळा करण्यासाठी दुरुपयोग

(संग्रहित छायाचित्र)

नागरिकांची वैयक्तिक, गोपनीय माहिती (सीडीआर, एसडीआर) अवैधरीत्या प्राप्त करून ती विकणाऱ्या खासगी व्यक्तींची धरपकड गुन्हे शाखेने सुरू केली आहे. या गोपनीय माहितीस शासकीय आस्थापनेतून पाय फुटले असून त्याचे स्रोतस्थान राजधानी दिल्लीत असावे, असा अंदाज गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

मोबाइल वापरकर्त्यांने कोणाला फोन केला, कोणाचे फोन त्याला आले, किती वेळ बोलणे झाले, त्या त्या वेळेस त्याचे अस्तित्व कोणत्या परिसरात होते हे तपशील सांगणारे सीडीआर आणि वापरकर्त्यांचे नाव, पत्ता आदी वैयक्तिक तपशील असलेले एसडीआर शासकीय आस्थापना विशेषत: पोलिसांना ठरावीक प्रक्रियेद्वारे प्राप्त करता येते. त्याव्यतिरिक्त अन्य कोणालाही ही माहिती उपलब्ध होत नाही. असे असूनही शहरातील काही गुप्तहेर ग्राहकांच्या समस्या, शंकांचे निरसन करण्यासाठी हे तपशील सहजरीत्या प्राप्त करतात, अशी माहिती गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक जगदीश साईल यांना मिळाली. त्याआधारे त्यांनी मुंबईतील ‘असेन्ट’ या ‘डिटेक्टिव्ह एजन्सी’चा प्रमुख शैलेश मांजरेकरला अटक केली. त्याच्या चौकशीतून देशभरातील गुप्तहेरांना त्यांच्या गरजेनुसार सीडीआर, एसडीआर पुरवणाऱ्या सौरभ साहू या तरुणाचे नाव पुढे आले. तसेच साहूच्या माध्यमातून असे तपशील प्राप्त करणाऱ्या उत्तर प्रदेश, ओडिशा, कर्नाटक राज्यांतील गुप्तहेरांबाबतही माहिती उजेडात आली आहे. त्यानुसार साहूसह अन्य पाच जणांना अटक करण्यात आली.

अटक आरोपींकडे देशभरातील सुमारे ४०० व्यक्तींचे सीडीआर आणि पाच लाख व्यक्तींचे पत्ते, अन्य वैयक्तिक तपशील सापडले. हे सर्व तपशील साहू दिल्लीतून प्राप्त करत होता, अशी माहिती पुढे आली आहे. त्याबाबत खातरजमा सुरू आहे, असे गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

ठाणे पोलिसांनी काही वर्षांपूर्वी देशातल्या पहिल्या महिला गुप्तहेर राजनी पंडित यांना अशाच प्रकरणात अटक केली होती. तेव्हा त्यांच्यासोबत अटक झालेल्यांत आठवीपर्यंत शिक्षण झालेल्या साहूचा समावेश होता.

एसडीआर, सीडीआरचा गैरवापर सुरू झाल्यानंतर त्याबाबत नियम आखण्यात आले. पोलिसांसाठी प्राधिकारी नेमण्यात आले. त्यांच्या विनंतीशिवाय मोबाइल सेवा पुरवठादार कंपन्या हे तपशील देणार नाहीत, असा नियम करण्यात आला. त्यानुसार मुंबई पोलीस दलात गुन्हे शाखेसाठी अतिरिक्त आयुक्त, पोलीस ठाण्यांसाठी उपायुक्त आणि जिल्ह्य़ांसाठी अधीक्षक यांना प्राधिकारी करण्यात आले. असे असताना साहूने हे तपशील कसे प्राप्त केले, याचा तपास गुन्हे शाखा करणार आहे.

विवाहबाह्य़ संबंध, चारित्र्य पडताळणी

गुप्तहेरांनी अवैधरीत्या प्राप्त केलेले बहुतांश सीडीआर, एसडीआर पती-पत्नीचे विवाहबाह्य़ संबंध, लग्न जुळवण्याआधी वधू-वराच्या चारित्र्य पडताळणीशी संबंधित आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Arrest of illegal cdr recipients abn

ताज्या बातम्या