जाहिराती देऊन झाल्या, भित्तीचित्रे लावून झाली, रेडिओ-टीव्हीवरही जाहिराती दाखवून-ऐकवून झाल्या, तरीही शहाणी-आरोग्याबाबत जागरूक असणारी मुंबईची जनता त्याकडे कानाडोळा करत असल्याचे ध्यानात आल्याने महापालिकेने आता डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी थेट कारवाईचा बडगाच उगारला आहे. ज्याच्या घरात डासांची उत्पत्तीस्थाने आढळतील त्याला थेट अटक करून पोलीस ठाण्याची वारी घडवून आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डेंग्यू-मलेरियाची साथ पसरवून समाजात उपद्रव निर्माण केल्याबद्दल संबंधित व्यक्ती किंवा संस्थेविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात येणार आहे. आतापर्यंत शेकडो जणांना दंड करूनही घरे व संस्थांच्या आवारात डासांची उत्पत्तीस्थाने आढळत असल्याने पालिकेने हे पाऊल उचलले आहे.
डेंग्यूचे विषाणू पसरवणारे एडिस इजिप्ती हे डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. कुंडय़ांखालची ताटे, फुलदाण्या, अडगळीला टाकलेली भांडी, फेंगशुईची रोपे. अशा अनेक ठिकाणी डासांच्या अळ्या सापडल्या आहेत. चहा प्यायल्यावर फेकलेल्या प्लास्टिकच्या कपात पाणी साठून तेथेही डासांची उत्पत्ती आढळली आहे. याबाबत जाहिराती, भित्तीचित्र, रेडियो-टीव्हीवरील संदेश यातून जागृती करूनही नागरिक गांभीर्य दाखवत नाहीत. जानेवारीपासून आतापर्यंत पालिका रुग्णालयात ६२० डेंग्यू रुग्ण उपचारांसाठी दाखल झाले आहेत. पावसाळा संपल्यानंतर होत असलेल्या तापमानातील बदलांमुळे गेल्या महिन्याभरात डेंग्यूचा उद्रेक वाढला. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी स्थायी समितीत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. सर्वच सदस्यांनी डेंग्यूबाबत तसेच प्रशासनाच्या दिरंगाईबाबत ताशेरे ओढले.
एका प्रभागात १८४, मग शहरात किती डेंग्यू रुग्ण?
कांजूरमार्ग येथील ११० क्रमांकाच्या प्रभागात असलेल्या चार खासगी रुग्णालयात ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूवरील उपचारांसाठी १८४ रुग्ण दाखल झाले. अनिकेत रुग्णालयात ६२, साईसमृद्धीमध्ये ९, अंकुरमध्ये ७२ तर आरोग्यम रुग्णालयात ३१ रुग्ण दाखल झाले. एका प्रभागात एका महिन्यात डेंग्यू रुग्णांची संख्या एवढी वाढलेली असताना पालिका अधिकारी मात्र संपूर्ण शहरातील रुग्णांची संख्या २०० वर दाखवत नाहीत. समस्याच मान्य केली नाही तर उपाय कसे करणार, असा प्रश्न राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी व्यक्त केला. कीटकनाशकांचाफवारा करण्यासाठी कंत्राटावर गाडय़ा घेण्यात आल्या होत्या. त्यासाठी १६ जुलै रोजी १४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. कीटकनाशकासाठीही दर पंधरवडय़ाला चार ते पाच कोटी रुपये खर्च केले जातात. एवढा खर्च केल्यावरही आरोग्य अधिकारी किटकनाशकांबाबत एवढे हलगर्जीपणा करत आहेत, असा आरोप पिसाळ यांनी केला.
निवडणुका कारणीभूत
निवडणुकांच्या कामांसाठी कर्मचारी गेल्यामुळे मान्सूनमध्ये घेतली जाणारी आरोग्य शिबिरे घेता आली नाहीत. गेल्या महिन्याभरात आरोग्य शिबिरे घेतली गेली नसल्याने डेंग्यूची साथ अधिक वाढली. गेल्या आठवडय़ात कीटकनाशके फवारण्यासाठी आवश्यक असलेले डिझेल संपले होते. मात्र आता ती समस्या नाही, असे पालिका रुग्णालयाच्या प्रमुख संचालिका डॉ. सुहासिनी नागदा म्हणाल्या.
  सार्वजनिक ठिकाणच्या डेंग्यूउत्पत्तीचे काय..
खासगी इमारतींमध्ये पालिका कारवाई करत असली तर सार्वजनिक ठिकाणीही डेंग्यूची अंडी सापडतात. ही ठिकाणी पालिकेच्या अखत्यारीत येत असतात, मग पोलीस पालिकेच्या अधिकाऱ्यांना अटक करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या वर्षी मातोश्रीच्या परिसरात, अनेक सेलिब्रेटीजच्या घरी डासांच्या अळ्या सापडल्या होत्या. मग त्यांच्यावर कारवाई होणार की फक्त जनसामान्यांनावरच कारवाईचा बडगा उचलणार, याबाबत प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.

डासांची उत्पत्तीस्थाने आढळल्यावर ताकीद देणे, कारणे दाखवा नोटीस पाठवणे, दंडाधिकाऱ्यांमार्फत दंड आकारणे असे उपाय करूनही फारसा प्रभाव  पडलेला नाही. अखेर गलथानपणामुळे डेंग्यू-मलेरियासारख्या जीवघेण्या आजारांची साथ पसरवण्यास कारणीभूत ठरल्याबाबत संबंधितांना पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत. या सूचनेची तातडीने अंमलबजावणी होणार आहे.  
– डॉ. सुहासिनी नागदा, पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांच्या संचालिका
    
गेल्या वर्षभरातील खटले
*महापालिका अधिनियम १८८८, कलम ३८१, अ आणि ब यांच्यानुसार डासांच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरलेल्या व्यक्ती, संस्थाविरोधात पालिकेने दंड आकारण्याची, कारणे दाखवा नोटीस पाठवण्याची कारवाई केली.
*२०१३ मध्ये १८,४३३ जणांविरोधात नोटीस काढल्या गेल्या.
*१,०९४ जणांविरोधात खटले दाखल  
*दोन ते दहा हजारादरम्यान प्रत्येकाकडून दंड वसूल करण्यात आला.
*दंडापोटी २७ लाख ६ हजार १०० रुपये जमा
*२०१४  मध्ये ३० सप्टेंबरपर्यंत १२,६७३ नोटीस काढल्या गेल्या
*७४० व्यक्ती, संस्थाविरोधात खटके दाखल
*१९ लाख ६१ हजार ५०० दंड वसुली