मुंबई : ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी ऊर्फ डीएसकेंची मेहुणी अनुराधा पुरंदरे यांना उच्च न्यायालयाने मंगळवारी दोन लाख रुपयांच्या व्यक्तिगत जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला.

न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्यासमोर मंगळवारी या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने पुरंदरे यांना जामीन मंजूर करताना देशाबाहेर जाण्यास मनाई करत पारपत्र तपास यंत्रणेकडे जमा करण्याचे तसेच तीन महिन्यांतून एकदा तपास यंत्रणेपुढे हजेरी लावत तपासांत सहकार्य करण्याचे आदेश दिले. पुरंदरे या प्रकरणी साडेतीन वर्षांपासून कारागृहात होत्या. मात्र त्यांच्याविरोधात लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत. या प्रकरणाशी त्यांचा काहीही संबंध नाही. आपण केवळ कारकून म्हणून डीएसकेंच्या कंपनीत कार्यरत होतो. याशिवाय गेल्या तीन वर्षांहून जास्त काळ आपण कारागृहात असून खटला लवकरात लवकर निकाली निघण्याची शक्यता नाही, असा दावा पुरंदरे यांनी केला होता.