मुंबई : कलादिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्येनंतर चित्रपटसृष्टीतील कलादिग्दर्शक, निर्माते आणि तंत्रज्ञांनी मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

कृष्णकुंज येथे झालेल्या बैठकीत सेटवर वा चित्रीकरण स्थळी येऊन युनियनचे पदाधिकारी कशा प्रकारे त्रास देतात, पैशाची मागणी करतात, या संदर्भात सविस्तर माहिती कलादिग्दर्शक, निर्माते यांनी राज ठाकरे यांना दिली. चित्रपटक्षेत्रातील लोकांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न ठाकरे यांनी केला. या बैठकीला निर्माते नितीन वैद्य, कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, संतोष फुटाणे आणि अन्य काही निर्माते, कलादिग्दर्शक हजर होते.

चित्रपटसृष्टीत सुरू असलेली परप्रांतीयांची ही मुजोरी थांबवण्याची मागणी ठाकरे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी ज्या अलाईड मजदूर युनियनच्या पदाधिकाऱ्यांकडून ही दादागिरी के ली जाते आहे, त्या युनियनपासून फारकत घेण्याची सूचना राज ठाकरे यांनी केली.

जुन्या युनियनमधून बाहेर पडलात तरच एक नवीन युनियन उभी करता येईल. कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नसलेली नवीन युनियन स्थापन करावी, असे राज ठाकरे यांनी सुचवले.

निर्मात्यांची मागणी

राज्यात डॉक्टर्स आणि रुग्णालयांवर होणाऱ्या हल्ल्यांपासून त्यांना संरक्षण मिळावे यासाठी कायदा झाला आहे.  त्याच धर्तीवर मनोरंजन उद्योगालाही संरक्षण देणारा कायदा झाला पाहिजे, अशी मागणी निर्मात्यांच्या संघटनांकडून बुधवारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याबरोबर होणाऱ्या बैठकीत करण्यात येणार असल्याची माहिती निर्माते नितीन वैद्य यांनी दिली. या संदर्भात तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येणार असल्याचेही  सांगितले.

साप्ते आत्महत्याप्रकरणी आज गृहमंत्र्यांकडे बैठक

कला दिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्येचे पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले. तर या प्रकरणी चित्रनगरीतील गुंडगिरी तसेच काही टोळ्यांकडून होणाऱ्या जाचाच्या तक्रोरी प्राप्त झाल्याने गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी बुधवारी सर्व संबंधितांची बैठक बोलाविली आहे.

साप्ते यांच्या आत्महत्येचा मुद्दा काँग्रेसचे नाना पटोले यांनी उपस्थित के ला. चित्रनगरीत गुंडटोळ्यांकडून दिग्दर्शकांना त्रास दिला जातो. त्यांच्याकडून खंडण्या उकळल्या जातात. या गुंडगिरीचा म्होरक्या हा भाजपचा आमदार असल्याचा आरोपही पटोले यांनी के ला. यावरून सत्ताधारी आमदारांनी कारवाईची मागणी के ली.