मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी सीईटी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली असून, अनेक अभ्यासक्रमांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार एएसी कला शिक्षणाअंतर्गत असलेल्या रेखा व रंगकला, शिल्पकला, वस्त्रकला, मातकाम, अंतर्गत गृहसजावट, धातूकला, उपयोजित कला या अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ देण्याचा निर्णय सीईटी कक्षाने घेतला आहे.

या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना १३ मार्चपर्यंत नोंदणी करता येणार आहे. एएसी – कला शिक्षण सीईटी या प्रवेश परीक्षेमध्ये २ हजार ४०५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून या अभ्यासक्रमासाठी अर्ज नोंदणी करण्यासाठी ४ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली हाती. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी नोंदणी झाली असून तसेच प्रवेश परीक्षा १० एप्रिल रोजी आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमााला नोंदणी करता यावी यासाठी सीईटी कक्षाने एएसी कला शिक्षण या अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी अर्ज नोंदणी करण्याकरिता १३ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. २०२५ च्या कला शिक्षणाच्या सीईटीमध्ये २ हजार ७८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या http://www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांसाठीची सीईटी परीक्षा राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने ऑनलाईन घेतल्या जातील. उमेदवारांनी पुढील अद्ययावत माहिती, तपशीलवार वेळापत्रक आणि परीक्षेशी संबंधित सूचनांसाठी नियमितपणे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

मागील तीन वर्षांमध्ये नोंदणीमध्ये घट

एएसी अभ्यासक्रमाला यंदा गतवर्षीच्या तुलनेत कमी प्रतिसाद मिळाला आहे. मागील तीन वर्षांमध्ये या अभ्यासक्रमासाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत आहे. २०२३-२४ मध्ये ३ हजार ४६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यानंतर २०२४-२५ मध्ये यात घट होऊन ३ हजार १८१ इतकी नोंदणी झाली. तर गतवर्षी म्हणजे २०२५-२६ मध्ये २ हजार ७८९ विद्यार्थ्यांनी नोंद केली होती.

अपार आयडी, युडीआयडी गरजेचे, पण बंधनकारक नाही

यावर्षीपासून विद्यार्थ्यांची अचूक माहिती उपलब्ध व्हावी, तसेच त्यांची पडताळणी करणे सहज शक्य व्हावे यासाठी राज्य सामाईक प्रवेश कक्षाने सीईटी प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी ‘ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडेमिक अकाऊंट रजिस्ट्री (अपार) आयडी व दिव्यांग विद्यार्थ्याना युनिक डिसॲबिलिटी आयडी (युडीआयडी ) गरजेचे केले आहे, पण बंधनकारक नाही. विद्यार्थ्यांनी सीईटीमध्ये नोंदणी करताना अपार आयडी व युडीआयडीची नोदणी करावी, यावरून विद्यार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप त्यांचा अपार आयडी तयार केलेला नाही त्यांनी तो डिजीलॉकरद्वारे तयार करावा. काही तांत्रिक कारणामुळे जर अपार आयडी व युडीआयडी तयार न झालेल्या विद्यार्थ्यानाही अपार आयडी व युडीआयडीशिवाय सीईटीसाठी नोंदणी करता येईल.