अभिनेता संजय दत्तच्या जीवाला धोका असल्याचे निनावी पत्र बुधवारी मुंबईतील आर्थर रोड कारागृहाला मिळाले. या पत्राची गंभीर दखल अधिकाऱयांनी घेतली असून, संजय दत्तला अधिक सुरक्षा पुरविण्यात येईल, असे कारागृहातील अधिकाऱयांनी सांगितले.
सजय दत्त गुरुवारी सकाळी टाडा न्यायालयात शरणागती पत्करणार आहे. त्यानंतर त्याला काही दिवसांसाठी आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. याच पार्श्वभूमीवर आर्थर रोड कारागृहातील अधिकाऱयांना मिळालेल्या पत्राला महत्त्व आले आहे.
थेट पुण्यातील येरवडा कारागृहात शरण येण्याची परवानगी मिळावी, यासाठी अभिनेता संजय दत्त याने मंगळवारी विशेष टाडा न्यायालयात दाखल केलेला अर्ज त्याच्या वकिलांनी बुधवारी सकाळी मागे घेतला.
आपल्या जीवाला मूलतत्त्ववाद्यांकडून धोका असल्यामुळे न्यायालयाऐवजी आपल्याला थेट येरवडा कारागृहात शरणागती पत्करण्याची परवानगी द्यावी, यासाठी संजय दत्तने टाडा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर न्यायालयाने मंगळवारी सीबीआयला आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते. या विषयीची सुनावणी बुधवारपर्यंत स्थगित करण्यात आली होती. बुधवारी सीबीआय आपले म्हणणे मांडण्यापूर्वीच संजयच्या वकिलांनी टाडा न्यायालयाने नवीन अर्ज दाखल करून मंगळवारी दाखल केलेला अर्ज मागे घेत असल्याचे सांगितले.