प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाने क्रुझ शिप ड्रग्ज प्रकरणी गुरुवारी (२८ ऑक्टोबर) जामीन मंजूर केला. मात्र, अद्यापही तो तुरुंगाबाहेर निघाला नाहीये. शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) न्यायालयाचा आदेश निघाला त्यानंतर आर्यनची सुटका होईल असं वाटलं मात्र तेव्हाही सुटका झाली नाही. अखेर आज (३० ऑक्टोबर) सकाळपासून आर्यनच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू झालेत. आता आर्यनची सुटका कधी होणार याबाबत मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगाचे पोलीस अधीक्षक निती वायचाळ यांना विचारले असता त्यांनी याचं उत्तर दिलंय. ते माध्यमांशी बोलत होते.

ऑर्थर रोड जेलचे पोलीस अधीक्षक नितीन वायचाळ म्हणाले, “आम्हाला आर्यन खानला सोडण्याचे आदेश मिळाले आहेत. त्याला सोडण्याची सर्व प्रक्रिया १ ते २ तासात पूर्ण केली जाईल.”

हेही वाचा : आर्यन खानला १ लाख रुपयांच्या बाँडसह ‘या’ १४ अटींवर जामीन, उच्च न्यायालयाचा निर्णय

एकूणच आर्यन खान तुरुंगाबाहेर येण्यासाठी आज दुपार होऊ शकते. दुपारी १२ पर्यंत आर्यन खान तुरुंगाबाहेर असेल, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

जामीन देताना न्यायालयाने घातलेल्या १४ अटी खालीलप्रमाणे,

१. प्रत्येक आरोपीला एक किंवा अधिक जामीनदारासह १ लाख रुपयांचा पी. आर. बँड द्यावा लागेल.
२. आरोपींनी त्यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार जे गुन्हे दाखल आहेत. त्या किंवा तशा इतर कोणत्याही कृतीमध्ये सहभागी होऊ नये.
३. आरोपींनी या गुन्ह्यातील सहआरोपी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क साधू नये.
४. आरोपींनी एनडीपीएस विशेष न्यायालयासमोर सुनावणी सुरू असलेल्या कोणत्याही गोष्टीत बाधा येईल अशा कृती करू नये.
५. आरोपीने स्वतः किंवा इतर कुणाच्या माध्यमातून साक्षीदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नये किंवा पुराव्यांशी छेडछाड करू नये.
६. आरोपींनी तात्काळ आपले पासपोर्ट विशेष न्यायालयाकडे जमा करावेत.
७. आरोपींनी विशेष न्यायालयासमोर सुरू असलेल्या प्रकरणावर कोणत्याही प्रकारच्या माध्यमांसमोर वक्तव्य करू नये.
८. विशेष न्यायालयाकडून परवानगी घेतल्याशिवाय आरोपींनी देश सोडून कुठेही जाऊ नये.
९. आरोपींना मुंबई बाहेर कुठेही जायचे असेल तर त्यांना तपास अधिकाऱ्यांना याची माहिती द्यावी लागेल. तसेच तपास अधिकाऱ्यांना आपल्या प्रवासाचे सर्व तपशील द्यावे लागतील.
१०. आरोपींना प्रत्येक शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान एनसीबीच्या मुंबई कार्यालयात हजर रहावे लागेल.
११. आरोपींना न्यायालयातील प्रत्येक तारखेला हजर रहावे लागेल. याला केवळ विशेष परिस्थितीत अपवाद असेल.
१२. आरोपींना एनसीबी तपासासाठी जेव्हा जेव्हा बोलावेल तेव्हा चौकशीसाठी हजर रहावे लागेल.
१३. खटला सुरू झाल्यानंतर आरोपीने ही सुनावणी प्रलंबित होईल किंवा उशीर लागेल असं काहीही करू नये.
१४. आरोपीने यापैकी कोणत्याही अटीचा भंग केल्यास एनसीबीला विशेष न्यायालयात जामीन रद्द करण्याचा अधिकार असेल.