अधुऱ्या स्वप्नाची अखेर

१९६७ मध्ये, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात त्यांनी अजिक्य समजल्या जाणाऱ्या स. का. पाटील यांच्यासमोर दंड थोपटले

काळा घोडा येथील जॉर्ज फर्नाडिस यांच्या सभेचे संग्रहित छायाचित्र

दिनेश गुणे

‘मी राजकारणातून निवृत्त होईन तेव्हा मुंबईत परतेन, दोन खोल्यांचे एखादे घर युनियनकडे मागून घेईन आणि निवांतपणे पुस्तके वाचून माझे उत्तरायुष्य व्यतीत करेन. माझ्या पश्चात ते दोन खोल्यांचे घर पुन्हा युनियनच्या मालकीचेच असेल!’.. एका अत्यंत हळव्या क्षणी, जिव्हाळ्याच्या काही मित्रांसोबत गप्पा मारताना जॉर्ज फर्नाडिस यांनी पाहिलेले निवृत्तीनंतरचे हे स्वप्न वास्तवात आलेच नाही. तरीही, आपल्या बोटाच्या इशाऱ्यावर उभ्या मुंबईची गती थांबविणाऱ्या आणि सुरू करणाऱ्या या ‘बंदसम्राट’ कामगार नेत्याचे मुंबईशी असलेले नाते तुटले नाही.

जॉर्ज फर्नाडिस देहाने जरी दिल्लीत असले, तरी त्यांच्या मनाची नाळ मुंबईच्याच मातीत पुरलेली आहे, याची साक्ष त्यांच्या या स्वप्नातून मिळते. म्हणून, जॉज फर्नाडिस देशाचे संरक्षणमंत्री झाले, कोकण रेल्वेचे खरे शिल्पकार झाले आणि बिहारमधील मुझफ्फरपूरचे खासदार झाले, तरी ते खरे मुंबईचेच सुपुत्र! जॉर्ज फर्नाडिस यांच्या नेतृत्वाला मुंबईने खतपाणी दिले, त्यातून त्यांचे नेतृत्व इथे फुलले. मुंबईच्या या उपकारांची परतफेडही जॉर्ज फर्नाडिस यांनी आपल्या आगळ्या कृतीतून केली. ती कृती म्हणजे, त्यांनी मुंबईकरांमध्ये फुलविलेला आत्मविश्वास!..

१९६७ मध्ये, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात त्यांनी अजिक्य समजल्या जाणाऱ्या स. का. पाटील यांच्यासमोर दंड थोपटले. ‘तुम्ही स.का. पाटलांचा पराभव करू शकता’, अशी एक हाक त्यांनी मुंबईकरांना दिली, आणि मुंबईच्या मतदारांना जणू राजकीय आत्मविश्वास प्राप्त झाला. जॉर्ज फर्नाडिस यांच्या या एका वाक्यातून मुंबईकरांची राजकीय अस्मिता जणू चेतविली गेली, आणि स.का.पाटलांना पराभव पत्करावा लागला. जाहीर सभांतील तडाखेबंद भाषणांमुळे भारावलेल्या श्रोत्यांसमोर प्लास्टिकची  बादली धरून निवडणूक निधीसाठी हात पसरणारा व अहोरात्र श्रमिकांसाठी झटणारा नेता ही जॉर्ज फर्नाडिस यांची ओळख जुन्या पिढीतील मुंबईकर अजूनही विसरलेले नाहीत. जॉर्ज फर्नाडिस केंद्रीय मंत्री झाले, पण मुंबईतील टॅक्सीवाल्यांना मात्र, त्यांची पहिली संघटना बांधणारा, त्यांच्यासाठी पतपुरवठा, सहकारी तत्वावरील दुकान सुरू करणारा नेता म्हणूनच ते परिचित राहिले. कारण आंदोलन हा त्यांच्या राजकारणाचा पाया मुंबईत रुजला आणि इथेच भक्कम झाला होता. १९७४ च्या रेल्वे कामगारांच्या देशव्यापी संपाने केंद्र सरकारला हादरा दिला, आणि जॉर्ज फर्नाडिस ‘बंदसम्राट’ झाले.. त्याआधी आणि त्यानंतरही कामगारांच्या एकजुटीचे आणि आंदोलनाचे एवढे प्रभावी दर्शन देशाला घडलेच नाही. आणीबाणीच्या विरोधात जॉर्ज तर एखाद्या सेनापतीसारखे अग्रणी राहिले. साखळदंडांनी हातपाय जखडलेल्या जॉर्ज फर्नाडिस यांचे छायाचित्र हे आणीबाणीतील राजकीय दडपशाहीचे प्रतीक बनले, आणि निवडणूक प्रचारातील प्रभावी ‘पोस्टर’ही झाले. त्या पोस्टरने इंदिरा सरकारविरोधाचा उद्रेक उफाळला, आणि एका प्रस्थापित सरकारला जनतेने पायउतार केले. विद्रोह, विवाद, बंड आणि अखेरीस, यश असा बिनधास्त राजकीय प्रवास करणाऱ्या या नेत्याने आणीबाणीच्या काळात पगडी आणि दाढी ठेवून शीख पेहराव परिधान करीत सरकारी यंत्रणांना चकविले, पण अखेर ते पोलिसांच्या हाती सापडलेच.. तिहार तुरुंगात मिसाबंदी म्हणून राजकीय शिक्षा भोगताना तुरुंगातील कैद्यांना गीतेवर प्रवचने देणाऱ्या या नेत्यास आठ भाषा अस्खलितपणे अवगत होत्या.

तुरुंगातूनच १९९७ ची लोकसभा निवडणूक मुझफ्फरपूरमधून लढवून  विक्रमी मतांनी विजयी झालेल्या जॉर्ज फर्नाडिस यांनी जनता पार्टी सरकारमध्ये उद्योगमंत्रीपद मिळाले, पण काही काळातच बाहेर पडून त्यांनी समता पार्टीची स्थापना केली. या काळातच त्यांची भाजपशी जवळीक वाढली होती. पुढे वाजपेयी सरकारमध्ये ते संरक्षणमंत्री झाले. याच काळात जिव्हाळ्याच्या मित्रांशी गप्पा मारताना  त्यांच्या मनावरील मुंबईतील हळव्या आठवणींचा पदर अलगद उलगडून जायचा.. मग चौपाटीवरच काढलेले दिवस, तिथलाच एखादा कोपरा पाहून घालविलेल्या एकाकी रात्री, फुटपाथवरचे खाणे, असे कितीतरी प्रसंग जिवंत व्हायचे.

कर्नाटकात जन्मलेला एका ख्रिस्ती धर्मगुरुचा हा मुलगा, धर्मप्रसारात मन रमत नाही म्हणून वयाच्या जेमतेम १६ व्या वर्षी मुंबईत आला, आणि त्या क्षणापासून तो मुंबईकर झाला.. कामगारांशी, श्रमिकांशी, फेरीवाल्यांशी त्याचे नाते जडले, आणि त्यांच्या जगण्याच्या संघर्षांत त्याने स्वतस झोकून दिले.. राजकीय जीवनात कधीकाळी यशाचे शिखर गाठलेल्या या नेत्याला उत्तरायुष्यात मात्र कौटुंबिक, राजकीय वादांनी घेरले. ते आरोपांच्या गर्तेत सापडले. कौटुंबिक संघर्षांत काहीसे कोलमडून गेले, आणि एकाकी झाले.. निवृत्तीनंतरचे आयुष्य मुंबईत घालविण्याचे स्वप्न अधुरेच राहिले!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Article on george fernandes