मुंबई : आंबा, केळी, पपई यांसारखी फळे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कॅल्शियम कार्बाईडचा (मसाला) वापर पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने (एफएसएसएआय) दिले आहे.

मात्र असे असतानाही अनेक ठिकाणी त्याचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हंगामी फळांच्या साठवणुकीदरम्यान याचा वापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन फळबाजार, मंडई, गोदामे, घाऊक विक्रेते आणि वितरण केंद्रांवर विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश एफएसएसएआयने राज्यांना दिले आहेत.

फळ व्यावसायिक झटपट व अधिक फायदा मिळविणऱ्यासाठी आंबा, केळी, पपई यांसारखी फळे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा (मसाला) वापर करत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. कॅल्शियम कार्बाईडमुळे नागरिकांना गिळताना त्रास होणे, उलट्या, त्वचेवर जखमा यासारखे गंभीर आरोग्यदोष उद््भवण्याची शक्यता असते. त्यामुळे एफएसएसएआयने २०११ च्या अन्न सुरक्षा नियमांनुसार कॅल्शियम कार्बाईडच्या वापरावर बंदी घातली आहे.

त्याचप्रमणे काही अन्न व्यवसायिक केळी व इतर फळे पिकवण्यासाठी ती ‘इथिफोन’ द्रावणात बुडवत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, एफएसएसएआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार फळांचा थेट संपर्क इथिलीन वायूच्या द्रव किंवा पावडर स्वरूपाशी होणे पूर्णपणे घातक आहे.

अधिकाऱ्यांना कडक नजर ठेवण्याचे आदेश

हंगामी फळांच्या साठवणुकीदरम्यान ‘मसाला’सारख्या रसायनांचा वापर होण्याची शक्यता अधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशातील अन्न सुरक्षा आयुक्त आणि प्रादेशिक अधिकाऱ्यांना विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश एफएसएसएआयने दिले आहेत. तसेच फळबाजार, मंडई, गोदामे, घाऊक विक्रेते आणि वितरण केंद्रांवर कडक नजर ठेवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

अधिकाऱ्यांना फळांच्या पेट्यांजवळ किंवा साठवण जागेत कॅल्शियम कार्बाईड आढळल्यास ते पुरावा मानून संबंधित अन्न व्यवसायिकांविरुद्ध अन्न सुरक्षा कायद्याच्या कलम ५९ अंतर्गत कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत. तसेच, कृत्रिम रंग, मेण यांसारख्या अप्रमाणित घटकांचा वापर केल्याचे आढळल्यास संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

स्ट्रिप पेपर टेस्ट’चा वापर करण्याचे आदेश

फळे पिकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोदामांमध्ये ॲसिटिलीन वायूचा शोध घेण्यासाठी ‘स्ट्रिप पेपर टेस्ट’चा वापर करण्यासही अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. देशभरात फळे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या धोकादायक रसायनांवर आळा घालण्यासाठी एफएसएसएआयने हे कडक निर्देश राज्य व केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.