मुंबई : भविष्यातील रंगकर्मीना घडविणारे व्यासपीठ म्हणून ओळख असलेल्या राज्य नाटय़स्पर्धाची व्याप्ती यंदा हीरक महोत्सवी वर्षांनिमित्ताने वाढली आहे. केवळ परराज्यातील नव्हे, तर परदेशातील कलावंतांनाही यंदा स्पर्धेत सहभागी होता येणार असून १ जानेवारीपासून ही स्पर्धा सुरू होईल.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ही स्पर्धा आयोजित केली जाते. यामध्ये राज्यातील १९ केंद्रांवर मराठी हौशी नाटक, १० केंद्रांवर बालनाटय़ांचा सोहळा होतो. संस्कृत, संगीत आणि हिंदूी या नाटकांना एकच सामायिक केंद्र देऊन तेथे राज्यभरातील स्पर्धक येतात. यंदापासून देशातील आणि देशाबाहेरील स्पर्धकांनाही यात सहभाग घेता येईल. त्यासाठी ऑनलाइन माध्यमांचा वापर करण्यात येणार आहे. येत्या दहा दिवसांत स्पर्धेचा विस्तृत तपशील जाहीर होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हौशी नाटय़कलावंतांचा मेळा असलेल्या या व्यासपीठातून व्यावसायिक रंगभूमीवर अनेक कलावंत घडले. मधल्या काही वर्षांत त्यांचा प्रभाव क्षीण झाला असला, तरी  बदलांमुळे या स्पर्धामध्ये पुन्हा पूर्वीचे वैभव लाभू शकते.

बदल काय?   राज्यातील स्पर्धा प्रत्यक्ष नाटय़गृहात होणार असली तरी दरवर्षी मराठी नाटक करणारा एक संघ मध्य प्रदेशातून सहभागी होतो. शिवाय दिल्ली, कर्नाटक, गोवा अशा जवळच्या राज्यांतूनही अनेक मराठी भाषिक नाटक करण्यास उत्सुक असतात. त्याचा आढावा घेऊन राज्य सरकारने या स्पर्धेची व्याप्ती वाढवली असून परदेशातील कलावंतांनाही यात सहभागी होता येईल.

थोडा इतिहास..

राज्यातील कलांचे संवर्धन करण्यासाठी १९६१ पासून शासनाच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या उपक्रमांत राज्य नाटय़स्पर्धाचा समावेश होतो.  देशात फक्त महाराष्ट्रातच अशाप्रकारे विस्तृत नाटय़मंच उभारला जातो.

प्रत्यक्ष नाटय़गृहात..

करोनामुळे गतवर्षी ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. यंदा मात्र राज्यातील स्पर्धकांचा प्रत्यक्ष नाटय़गृहात कस लागणार आहे. प्रवेश अर्ज मागवण्यात आले असून ३० नोव्हेंबर ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी १ जानेवारीपासून सुरू होईल तर अंतिम फेरी फेब्रुवारीमध्ये असेल.

स्पर्धेच्या हीरक महोत्सवी वर्षांचे औचित्य साधून स्पर्धेची व्याप्ती अधिक वाढविण्यात येत आहे. त्यामुळे राज्यासोबतच देशभरातील आणि जगभरातील मराठी रंगकर्मीना या स्पर्धेत सहभागी होता येईल. स्पर्धेच्या निमित्ताने मराठी रंगभूमी अधिक समृद्ध होईल.    

– अमित देशमुख, सांस्कृतिक कार्य मंत्री