मुंबई : दिल्लीतील बिकानेर हाऊसमध्ये काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पुत्र आणि छायाचित्रकार रेहान वाड्रा यांनी ऑक्टोबरमध्ये भरविलेल्या प्रदर्शनात व्यवस्थापनाने ऐनवेळी १०५ पैकी तब्बल ७४ छायाचित्रे हटविली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच कलाकारांच्या सर्जनशील अभिव्यक्तीच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहण्यासाठी मुंबई-पुण्यासह इतर भागातील शंभरहून अधिक कलाकार एकवटले आहेत. यात छायाचित्रकार, कलाकार, नाटककार, वास्तू रचनाकार, लेखक आणि कवी यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

रेहान वाड्रा यांनी ‘नो आयडिया इज फायनल’ या नावाने एकल छायाचित्रांचे प्रदर्शन बिकानेर हाऊस येथे ऑक्टोबरमध्ये आयोजित केले होते. यामध्ये वन्यजीवांच्या छायाचित्रांसोबतच गेल्या काही महिन्यांत दिल्लीत तरुणांनी व विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध आंदोलनांशी संबंधित छायाचित्रांही समावेश होता. प्रदर्शनाच्या औपचारिक उद्घाटनाच्या अवघ्या काही तास आधी बिकानेर हाऊसच्या व्यवस्थापनाने आंदोलनांशी संबंधित सुमारे ७४-७५ छायचित्रे तातडीने हटवण्याचे आदेश दिल्यानंतर ती छायाचित्रे हटविण्यात आली होती. याघटनेचा निषेध करण्यासाठी कलाकार एकत्र आले आहेत.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होऊ नये तसेच कलाकारांच्या सर्जनशीलतेवर कोणतीही बंधने असू नयेत याठी शंभरहून अधिक कलाकारांच्या वतीने प्रसिद्ध छायाचित्रकर संदेश भंडारे यांनी नुकत्याच एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे मागणी केली आहे. यात वसंत आबाजी डहाके, गणेश देवी, राजन गवस, लक्ष्मीकांत दशमुख, प्रमोद मजुमदार, अंजली चिकलपट्टी, येशू पाटील, विकास खोत, गजानन दुधोळकर, सतीश मोंडले, जयंत भीमसेन जोशी, प्राची दुबळे, ओंकार गोवर्धन यांसह इतरही कलाकारांचा समावेश आहे.

कोणत्याही सुसंस्कृत समाजात, कलाकार आणि सर्जनशील व्यक्तींना आपआपल्या कलाकृतींच्या माध्यमातून व्यक्त होण्यासाठी मुक्त वातावरणाची अपेक्षा असते. ज्या देशांमध्ये असहिष्णुता वाढीस लागते किंवा जिथे सत्ताधारी व्यवस्था प्रत्येक प्रकारच्या असहमतीला दडपून टाकण्याचा प्रयत्न करते, तिथे कलाकार अनेकदा सहज लक्ष्य बनतात. असावेळी कलाकरांनी पीडित कलाकारांच्या आणि त्यांच्या सर्जनशील अभिव्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे, असे भंडारे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.