मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी एकूण २ हजार ०४० नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले. तर एकूण सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले. शुक्रवारी कुख्यात गुंड अरुण गवळीच्या दोन्ही मुलींनी उमेदवारी अर्ज भरले. माजी नगरसेविका गीता गवळी आणि धाकटी मुलगी योगिता गवळी या दोघींनी अखिल भारतीय सेनेकडून भायखळा विभागातील ई विभागामधून अर्ज भरले. गेल्या तीन दिवसात एकूण ९ उमेदवारांनी अर्ज भरले.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी २३ डिसेंबरपासून नामनिर्देशन पत्र वितरणाला सुरूवात झाली. त्यानुसार कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून शुक्रवारी २ हजार ०४० नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले. तर सात अर्ज दाखल झाले. गेल्या तीन दिवसात एकूण एकूण ९ हजार ०४९ अर्जांचे वितरण झाले. तर एकूण ९ अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज भरण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंत मुदत आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या महानगरपालिका निवडणूक २०२५ – २६ च्या कार्यक्रमानुसार, उमेदवारांना नामनिर्देशन पत्रे देण्यास मंगळवार, २३ डिसेंबर २०२५ पासून सुरुवात झाली. मंगळवार, २३ डिसेंबर रोजी एकूण ४ हजार १६५ नामनिर्देशन अर्जांचे, तर बुधवार, २४ डिसेंबर रोजी २ हजार ८४४ नामनिर्देशन अर्जांचे वितरण झाले. तसेच २ नामनिर्देशन पत्र दाखल झाली होती. नामनिर्देशन पत्रे वितरणाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे २६ डिसेंबर रोजी २ हजार ०४० नामनिर्देशन पत्रांचे वितरण झाले. तर, ७ नामनिर्देशन पत्र दाखल झाली.
दरम्यान, शुक्रवारी अखिल भारतीय सेनेच्यावतीने गीता गवळी यांनी प्रभाग क्रमांक २१२ मधून, तर त्यांची बहीण योगिता गवळी यांनी प्रभाग क्रमांक २०७ मधून अर्ज भरला. प्रभाग २१२ मधून गीता गवळी या २०१७ मध्ये निवडून आल्या होत्या. तर योगिता गवळी यांनी प्रथमच अर्ज भरला आहे. योगिता यांनी उमेदवारी अर्ज भरलेल्या प्रभाग क्रमांक २०७ मधून २०१२ मधील निवडणुकीत त्यांची काकी वंदना गवळी निवडून आल्या होत्या. तर २०१७ मधील निवडणुकीत त्या पराभूत झाल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी वंदना गवळी यांनी शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला आहे.
