सत्तरीच्या दशकातील गाण्यांची आवड असलेल्या अरुणा शानबाग यांच्यासाठी केईएमच्या त्यांच्या खोलीत ती गाणी लावली जात असत. एवढेच नव्हे, तर त्यांच्या उपचारांसाठी येत असलेल्या नर्सच्या दोन पिढय़ा बदलल्या असल्या तरी त्यांच्या आवडीचे मासे व गोड पदार्थ करून आणण्याच्या परंपरेत खंड पडलेला नव्हता. शानबाग यांच्याबद्दलची परिचारिकांची आत्मीयता तसूभरही कमी झालेली नव्हती. त्यामुळे त्यांच्या जाण्याने आज केईएममधील सारे वातावरण शोकाकूल झाले आहे.
सकाळी सात वाजता शानबाग यांचा दिवस सुरू व्हायचा. स्पंजने अंग पुसून तसेच कपडे बदलून दिल्यावर साडेनऊच्या सुमारास नाश्ता दिला जायचा. अन्न चावण्याची प्रक्रिया धीमी असल्याने नळीवाटे जेवण दिले जात असे. दूध, प्रोटीनयुक्त आहार, रवा कांजी, वरण-भात त्यांच्या आहारात असायचा. मात्र रोजचे हे जेवण करण्याचा त्यांनाही कधीतरी कंटाळा यायचा. त्यांना गोड पदार्थ तसेच मासे आवडायचे. त्यांच्या डोळ्यांमध्ये त्या भावना दिसायच्या अशी आठवण तेथील परिचारिका सांगतात. त्यामुळे त्यांची सेवा करणाऱ्या परिचारिका आवर्जून त्यांच्यासाठी वेगळे पदार्थ आणत. दिवाळीतही त्यांना पेढा-बर्फी देण्यात यायची, अशी माहिती मेट्रन अरुंधती वेल्हाळ यांनी दिली.