मुंबई : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ‘आम आदमी पार्टी’ने मुंबई महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर सर्व २२७ जागा लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे राज्यात भाजप विरोधी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या ठाकरे शिवसेना व काँग्रेसची मोठी कोंडी होणार आहे.
‘आप’चे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषदेत निवडणुका लढवण्यासंदर्भात घोषणा केली. ते म्हणाले, मुंबईची सध्या दुर्दशा झाली आहे. पालिकेचा अर्थसंकल्प ७४ हजार ४४७ कोटी रुपयांचा आहे. तरी मुंबईकर देशात सर्वाधिक कर भरतात आणि त्यांना निकृष्ट दर्जाच्या सार्वजनिक सेवा मिळत आहेत. मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचे माहेरघर आहे. पालिकेच्या शाळा बंद पडत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रे अस्तित्वात नाहीत. रुग्णालयांवर प्रचंड ताण आहे. ‘बेस्ट’ ला पद्धतशीरपणे संपवले जात आहे. बसगाड्यांची संख्या वेगाने कमी होत आहे. या शहरातील महागड्या मालमत्तांच्या आजूबाजूला घाणीचे साम्राज्य पसरले आहे, असा आरोप सिंह यांनी केला.
मुंबईत झाडांची कत्तल झाल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. प्रदूषण शिगेला पोहोचले आहे. समुद्रकिनारी असूनही हवा गुणवत्ता निर्देशांक दिल्लीसारखा खराब आहे. प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट समुद्रात सोडणारे मुंबई हे जगातील एकमेव शहर आहे, अशी टीका ‘आप’च्या मुंबई अध्यक्षा प्रीती मेनन-शर्मा यांनी केली.
स्वतंत्र भारताच्या इतिहासातील जमीन बळकावण्याचा सर्वात मोठा प्रकार धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली होत आहे. ९० हजार कोटी रुपयांच्या असलेल्या पालिकेच्या आपल्या मुदत ठेवी वेगाने कमी होऊन तळाला गेल्या आहेत. भ्रष्ट लोकांना दूर करण्यासाठी मुंबईत ‘झाडू’ची गरज आहे, असे आवाहन आपचे मुंबई कार्याध्यक्ष रुबेन मस्करेन्हस यांनी केले.
उमेदवार जाहीर

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मुंबईत २ लाख ७३ हजार मते (५.१६टक्के) मिळाली होती. आदमी पक्षाने महाराष्ट्रातील निवडणुका लढायच्या नाहीत, असा धोरणात्मक निर्णय घेतला होता. अलिकडच्या काही निवडणुकांमध्ये आम आदमी पक्ष महाविकास आघाडीचा घटक पक्ष होता. यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर सर्व जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्षाने आज निवडणुकीची घोषणा तर केलीच, मात्र २२७ पैकी २१ प्रभागातील उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामध्ये सर्व जातीय व धार्मीक गटांना प्रतिनिधीत्व दिलेले दिसते. आपने मुंबई पालिका निवडणुकीत उडी घेतल्याने ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाला फटका बसण्याची शक्यता आहे.
