Arvind Sawant criticizes Sachin Ahir: सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधानपरिषद उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. सहा खासदारांच्या फुटीनंतर आठ दिवसातच उद्धव ठाकरेंनी दुसरा धक्का बसला आहे. अहिर यांच्या फुटीनंतर ठाकरे गटाकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी याप्रकरणी विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. एकटा माणूस कसा जाऊ शकतो? संविधानातील शेड्युल १० चे काय? असे सवाल सावंत यांनी उपस्थित केले.

ही विकाऊ माणसं – अरविंद सावंत

“यांना बंडखोर कसं म्हणायचं? हे विकाऊ झाले, तुम्ही देशाच्या संविधानाला मानता का नाही? देशाच्या संविधानातील शेड्युल १० नुसार, एकटा माणूस कसा जाऊ शकतो?”, असा सवाल खासदार सावंत यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला. स्वेच्छेने पक्ष सोडणारे अपात्र व्हायला हवेत, असा मुद्दाही सावंत यांनी मांडला. कायद्याचे आणि मराठीचे विद्वान अध्यक्षांनी आमच्यावेळी काय केलं होतं? ते आता काय करतील? असे म्हणत नागरिकांनी देखील याचा विचार करण्याची गरज असल्याचे सावंत म्हणाले.

अरविंद सावंत यांनी कोणते प्रश्न उपस्थित केले?

१) लोकांनी विचार करायला हवा की हे संविधानाला कसे मानत नाहीत.
२) एकटा माणूस कसा जाऊ शकतो?
३) तुम्ही पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लिहिता ना? मग संविधानातील शेड्युल १० चे काय?
४) मराठी प्रमाणेच संविधान तरतुदींमध्ये विद्वान असलेले अध्यक्ष हे देखील योग्यच म्हणणार का?

अहिर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका

“मला निवडून देखील आणा आणि उपसभापती देखील करा, हा सौदा आहे”, असा आरोपही खासदार सावंतांनी केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर निवडून आलेले आहात, त्याच चिन्हावर तिकडे गेले आहात, मग कायद्याच्या चौकटीतून बघता त्यांना सोडता येईल का? असा प्रश्न सावंत यांनी केला. खासदार सावंत यांनी यावेळी माणसं विकाऊ झाल्याचा आरोप करत गद्दारी केल्याची टीका केली.