मुंबई: महापालिका निवडणुकीत विविध महापालिकांत ६७ नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यानंतर हीच पद्धत मुंबई महापालिकेतही राबविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे) नेते खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपले बंधू मकरंद नार्वेकर यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी कुलाबा प्रभाग क्र. २२६ मध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज भरणाऱ्या तेजल पवार यांना धमकावले. याबाबतची तक्रार त्यांनी पोलिसात करण्यात आली. विधानसभाध्य अध्यक्षांविरोधातील या तक्रारीमुळे भाजपची बिनविरोध नगरसेवक निवडून आणण्याची कार्यपद्धती उघड झाल्याची टीका अरविंद सावंत यांनी केली.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आप, बसपा, जनता दलाच्या उमेदवारांना रोखल्याचा आरोप झाला होता. याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रारही करण्यात आली होती. त्याचा अहवाल प्रतीक्षेत असतानाच तेजल पवार या अपक्ष नगरसेविकेने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी धमकावण्यात आल्यचा आरोप अरविंद सावंत यांच्याकडून करण्यात आला. तेजल पवार यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे संपूर्ण कुटुंबच त्यांच्या मागे लागले. पवार यांच्यावर मोठा दबाव असून एबी फॉर्म भरल्यानंतर आजपर्यंत त्यांना घरी जाता आलेले नाही. त्या मुलांना घेऊन घराबाहेर राहत आहेत, असा दावा करत राहुल नार्वेकर यांनी बंधू मकरंद नार्वेकर यांना बिनविरोध निवडून आणावे याकरिता त्यांच्या माणसांकडून थेट धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोप सावंत यांनी केला. दरम्यान, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पवार कुटुंबाला तातडीने पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी केली. तसेच पवार कुटुंबाचे काही बरे वाईट झाल्यास त्याला नार्वेकर सर्वस्वी जबाबदार असतील, असा इशाराही दिला.

नार्वेकरांकडून कोटींची ऑफर

आपण अर्ज भरल्यानंतर राहुल नार्वेकर माझे पती दीपक पवार यांना स्वत:च्या गाडीतून कार्यालयात घेऊन गेले. तेथून फोन करून मला अर्ज मागे घ्यायला सांगितले. माझे पतींसोबत राहुल नार्वेकर यांचे खासगी सचिव घरी आले. त्यांनी लाखो रुपयांचे आमिष दिले आणि त्यानंतर कोट्यवधी रुपयांचे आमिष देण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा खासगी सचिव पुन्हा घारी आला मात्र आपण दार उघडले नाही, असे तेजल पवार म्हणाल्या. त्यानंतर दीपक पवार यांना जबरदस्तीने नार्वेकरांच्या कार्यालयात नेण्यात आले. तिथे पत्नीचा अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणण्यात आला. आपण कोणत्या पदावर आहोत तुला माहीत नाही का? मी बोलावल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही यावे लागते, असे सांगत कुलाब्यात राहायचे आहे की नाही अशा शब्दात धमकावण्यात आले. त्यानंतर आम्ही फोन बंद केले आणि घरातून निघून गेलो, अशी माहिती दीपक पवार यांनी दिली.

आरोप बिनबुडाचे – राहुल नार्वेकर

हे आरोप फेटाळून लावताना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २ जानेवारीला संपली असताना ७ जानेवारीला हे आरोप का केले जात आहेत, असा सवाल राहुल नार्वेकरांनी विचारला. उमेदवारी मागे घेण्याची तारीख उलटून ५ दिवस झाले आहेत. या पाच दिवसांत हे लोक झोपले होते का? की काही विशेष प्लॅनिंग सुरू होते? हे सर्व राजकारण डोळ्यांसमोर ठेवून रचलेले नाटक आहे. पवार आणि कुटुंब पैसे उकळण्यासाठी सर्व काही करत असल्याचे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच यलोकांकडून ५-५ कोटी रुपये मागण्याचे प्रकार झाले असून, त्याबाबत आम्ही लेखी तक्रार आणि खुलासा करणार आहोत, असे नार्वेकर म्हणाले.