अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला आज पुन्हा एकदा जामीन नकारण्यात आला. सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगामध्ये असणाऱ्या आर्यन खानला न्यायालयाने दिलासा दिलेला नाही. आर्यन हा ३ ऑक्टोबरपासून तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे. २ ऑक्टोबरच्या रात्री मुंबईच्या समुद्रात कॉर्डेलिया क्रूझवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबीने छापा टाकल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.

१३ ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी केल्यानंतर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.व्ही.पाटील यांनी आपण २० ऑक्टोबर रोजी निकाल देणार असल्याचे सांगितले होते. मात्र आजच्या सुनावणीदरम्यान आर्यन खानला विशेष न्यायालयाने जामीन नाकारला आहे. अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या दोघांचे जामीन अर्जही फेटाळण्यात आले. आर्यनचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर संचालक समीर वानखेडे यांनी अवघ्या दोन शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिलीय.

आर्यन खान प्रकरणावरुन समीर वानखेडे यांच्या भूमिकेवरही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अनेकदा शंका उपस्थित केली आहे. तसेच त्यानंतर स्वत: वानखेडे यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा दावाही केल्याचं पहायला मिळालं. हे प्रकरण समोर आल्यापासून वानखेडे चांगलेच चर्चेत आहेत. असं असतानाच आता आर्यनला पुन्हा एकदा जामीन नाकारण्यात आल्यानंतर वानखेडेंनी मोजक्या शब्दात पहिली प्रतिक्रिया नोंदवलीय.

आर्यन खानच्या जामिनावर प्रदीर्घ चर्चेनंतर न्यायालयाने त्याला दिला न देण्याचा निर्णय दिलाय. एनडीपीएस न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केलेला नाही. बुधवारी एनसीबीने कोर्टात आर्यनचे असे काही चॅट सादर केले की जे ड्रग्ज विषयी होते. याच आधारावर न्यायालयाने जामीन नाकारल्याचा म्हटलं जात आहे. असं असतानाच समीवर वानखेडे यांनी आर्यनचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर, “सत्यमेव जयते” असं म्हणत प्रतिक्रिया दिल्याचं टाइम्स नाऊनं म्हटलं आहे. सत्याचाच विजय होणार असं वानखेडे यांना या वक्तव्यामधून अधोरेखित करायचं होतं.

या हाय प्रोफाइल प्रकरणावरुन मागील दोन आठवड्यांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच या विषयावरुन राजकीय पक्षही आमने-सामने आलेले असतानाच वानखेडे यांनी न्यायाव्यवस्थेवर विश्वास असल्याचं सूचित करणारं मत व्यक्त केलं असून सत्याचा विजय होईल अशी अपेक्षा व्यक्त केलीय.