मुंबई ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तब्बल २६ दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर आला आहे. न्यायालयातून जामीन मिळूनही कारागृह प्रशासनापर्यंत कागदपत्रे वेळेत न पोहोचल्याने आर्यन खानला आणखी एक रात्र मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात काढावी लागली. मात्र, शनिवारी तो तुरुंगातून बाहेर आला. न्यायालयाचा आदेश प्राप्त करण्यासाठी आर्थर रोड कारागृहातील बेल बॉक्स आज पहाटे ५.३० वाजता उघडण्यात आला. आर्यनला नेण्यासाठी शाहरुख खान जेलबाहेर उपस्थित होता.

त्यानंतर शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास तुरुंग अधिकाऱ्यांनी आर्थर रोड कारागृहाबाहेर जामीन पेटी उघडली. काल आर्यन खानच्या जामीन सुटण्याच्या आदेशाची प्रतदेखील जामीन पेटीत ठेवण्यात आली होती. त्यानंतर आर्यन खानची आर्थर रोड तुरुंगातून आज सकाळी १० वाजता सुटका होण्याची शक्यता आहे असे तुरुंग अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

आर्यन खानच्या सुटकेपूर्वी अभिनेता शाहरुख खान त्याच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्यातून मुंबईतील आर्थर रोड जेलसाठी रवाना झाला होता. त्यानंतर शाहरुख खानचा ताफा तुरुंगाजवळच्या फाईव्हस्टारमध्ये थांबला होता. आता आर्यन खानला कारागृहातून घरी नेण्यासाठी शाहरुख खान तुरुंगातून बाहेर पोहोचला आहे.

आर्यनच्या जामिनासाठी हायकोर्टाने १४ अटी घातल्या आहेत. आर्यन खान पोलिसांना कळवल्याशिवाय मुंबई सोडू शकणार नाही, त्याला दर शुक्रवारी एनसीबीसमोर हजर राहावे लागेल, असे या अटींमध्ये नमूद करण्यात आले आहे. जामीन आदेशानुसार, त्यांना एक लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलक जमा करावा लागेल आणि त्यांचा पासपोर्ट जमा करावा लागणार आहे.

कोर्टाच्या अटींनुसार आर्यनला परवानगीशिवाय देश सोडता येणार नाही. तसेच आर्यनला अरबाज मर्चंट आणि या प्रकरणातील आरोपींसारख्या मित्रांशी आणि माध्यमांशीही बोलता येणार नाही. आर्यनला शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत एनसीबी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. न्यायालयीन सुनावणीत उपस्थित राहून आवश्यकतेनुसार तपासात सहकार्य करावे लागेल. न्यायालयाच्या आदेशानुसार, यापैकी कोणत्याही अटींचे उल्लंघन झाल्यास, एनसीबीला जामीन रद्द करण्याची विनंती करण्याचा अधिकार असेल.

दरम्यान, आर्यन खानचे मन्नतमध्ये अतिशय भव्य पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत आर्यनच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आणि त्याला आनंद देण्यासाठी शाहरुख खान आणि गौरी यांनी सर्व तयारी केली आहे. शाहरुख खान आणि गौरी खानने मन्नत निळ्या दिव्यांनी सजवला जात आहे.

जुही चावला हमीदार

आर्यनच्या जामिनावरील सुटकेसाठी उच्च न्यायालयाने एक लाख रुपयांचे बंधपत्र तसेच त्याच रकमेचा हमीदार सादर करण्याची अट घातली होती. आर्यनची हमीदार म्हणून अभिनेत्री जुही चावला शुक्रवारी विशेष न्यायालयासमोर हजर झाली. न्यायालयाने तिला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात येण्यास सांगितले. आर्यनचे वडील शाहरुख खान आणि जुहीने चित्रपटांतून एकत्र काम केले असल्याने ती आर्यनला ओळखत असल्याचे त्याचे वकील सतीश मानेशिंदे यांनी न्यायालयाला सांगितले.