“गोसावीने प्रभाकर साईलचा नंबर समीर वानखेडे नावाने सेव्ह केला होता आणि..”; सॅम डिसोझाने उघड केली माहिती

ड्रग्जबाबत काही माहिती मिळाल्यास मी ती कोणाच्यातरी माध्यमातून एनसीबीपर्यंत पोहचवत असतो असे सॅम डिसोझा म्हणाले.

Aryan Khan case kiran Gosavi got Rs 50 lakh sam dsouza tell him to return
किरण गोसावीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे (एक्सप्रेस फोटो पवन खेंगरे/फाइल)

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आलेल्या सॅम डिसोझा यांनी मोठा दावा केला आहे. आर्यन खानकडून कोणतेही ड्रग्ज जप्त न केल्याचा दावा केला आहे. किरण गोसावी यांना पैशांचा व्यवहार करायचा होता असेही सॅमने यांनी सांगितले. सुनील नावाच्या व्यक्तीला गोसावी यांच्याकडून सूचना मिळत असल्याचा दावाही सॅम डिसोझा यांनी केला आहे. याआधी सॅम डिसोझा यांच्यावर अभिनेता शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि कॉर्डेलिया क्रूझ जहाजावरील छापा प्रकरणातील पंच साक्षीदार केपी गोसावी यांच्यात दलाली केल्याचा आरोप करण्यात आला होता.

आर्यन खानला यातून बाहेर काढण्यासाठी गोसावीने ५० लाख रुपये घेतले होते पण मी त्याला पैसे परत करायला लावले असा दावा देखील डिसोझा यांनी केला आहे. सोमवारी एबीपी माझासोबत बोलताना डिसोझा यांनी हे गौप्यस्फोट केले आहेत. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची या कथित डीलमध्ये कोणतीही भूमिका नव्हती आणि गोसावी यांनी केवळ त्यांच्या संपर्कात असल्याचे नाटक केले होते. किरण गोसावी हा फ्रॉड माणूस असल्याचे लक्षात आल्यानंतर डिसोझा यांनी दावा केला की त्यांनी गोसावीला पैसे परत केले.

गोसावीचा बॉडीगार्ड असलेल्या आणि या कथित ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईलने गेल्या महिन्यात डिसोझा यांच्याशी फोनवर बोलताना गोसावींना बोलताना ऐकल्याचा आरोप केल्यावर डिसोझा यांचे नाव पुढे आले होते. ज्यामध्ये दादलानीला २५ कोटी रुपये मागण्यात आले होते आणि त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असे साईलने म्हटले होते.

डिसोझा यांनी सांगितले की, “आम्ही तीन ऑक्टोबरच्या पहाटे ददलानी आणि गोसावी यांच्यात डील करण्यासाठी एकत्र भेटले होतो. ददलानी, तिचे पती, गोसावी, मी आणि इतर काही जण तीन ऑक्टोबरला पहाटे चारच्या सुमारास लोअर परेल येथे भेटलो. त्यानंतर मी तेथून निघून गेलो आणि नंतर गोसावीने आर्यनला “मदत” करण्यासाठी दादलानीकडून ५० लाख रुपये घेतले होते अशी माहिती मला मिळाली.”

“लोअर परळमधील भेटीदरम्यान गोसावीला फोन आला आणि त्यावर समीर सर असा कॉलर आयडी दाखवत होता. पण गोसावीने त्याच्या मोबाइलमध्ये प्रभाकर साईल याचा नंबर समीर वानखेडे नावाने सेव्ह होता आणि डील करताना आपण वानखेडे यांच्याशी बोलत असल्याचे त्याने दाखवले,” असे डिसोझा म्हणाले.

“किरण गोसावीचा खोटेपणा माझ्या नंतर लक्षात आला. कारण  त्याच्या मोबाइलमध्ये प्रभाकर साईल याचा नंबर समीर वानखेडे नावाने सेव्ह होता आणि ट्रू कॉलरवर मला ते दिसले. या भेटीनंतर काही तासांतच गोसावीवर दबाव आणून पैसे परत दिल्याची मी खात्री केली,” असा दावा डिसोझा यांनी केला.

या छाप्याशी आपला काहीही संबंध नसल्याचे डिसोझा यांनी सांगितले. त्यांनी दावा केला की, “एक ऑक्टोबर रोजी सुनील पाटील या पॉवर ब्रोकरचा फोन आला होता. पाटील यांनी मला सांगितले की, त्यांना दुसऱ्या दिवशी होणाऱ्या कॉर्डेलियावर ड्रग्जपार्टी विषयी काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. पाटील यांनी मला एनसीबीला ही माहिती देण्यास सांगितले. म्हणून मी गोसावींना फोन करून दोघांची ओळख करून दिली,” असे डिसोझा म्हणाले.

डिसोझा यांच्या म्हणण्यानुसार, आर्यनच्या अटकेनंतर गोसावीने आर्यनला दादलानीशी बोलायचे आहे असे सांगण्यासाठी फोन केला. आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नव्हते त्यामुळे त्याला मदत करायची आहे असे गोसावीने सांगितले होते. आपण काही मित्रांच्या माध्यमातून ददलानीच्या संपर्कात आल्याचा दावा डिसोझा यांनी केला.

एनसीबीशी असलेले त्याचे संबंध आणि तो ड्रग्ज पेडलर असल्याच्या आरोपांबद्दल विचारले असता, डिसूझा म्हणाले की, “यापूर्वी जेव्हाही त्यांना अंमली पदार्थांची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी ती एनसीबीच्या अधिकार्‍यांना दिली होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी माझा थेट संपर्क नाही. मात्र ड्रग्जबाबत काही माहिती मिळाल्यास मी ती कोणाच्यातरी माध्यमातून एनसीबीपर्यंत पोहचवत असतो.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aryan khan case kiran gosavi got rs 50 lakh sam dsouza tell him to return abn

ताज्या बातम्या