मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टीमध्ये अटक करण्यात आलेल्या आर्यन खानच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी करण्यासाठी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यासोबतच मुंबईत एनसीबीच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून आर्यनच्या मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावेत असे म्हटले आहे.

संविधानाच्या अनुच्छेद ३२ अन्वये एक याचिका देताना शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. वाईट हेतूंसह गेल्या दोन वर्षांपासून एनसीबी पक्षपाती दृष्टिकोन स्वीकारत आहे आणि चित्रपटातील व्यक्ती, मॉडेल आणि इतर सेलिब्रिटींना त्रास देत आहे असे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.

“विशेष एनडीपीएस कोर्टाने (मुंबई) सार्वजनिक सुट्टीचा हवाला देत आर्यन खान आणि इतर आरोपींची जामीन याचिका २० ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलल्याने आरोपींची मोठी बदनामी झाली आहे. आर्यन खानला १७ रात्री बेकायदेशीर तुरुंगात ठेवण्यात आले होते. हे राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या जीवन आणि स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचे पूर्ण उल्लंघन आहे,” असे तिवारी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आर्यनच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे. आर्यन क्रूझ रेव्ह पार्टी ड्रग्स प्रकरणात तुरुंगात आहे. आर्यनच्या जामिनावर सुनावणी करणाऱ्या विशेष एनडीपीएस न्यायालयाने गेल्या सुनावणीत जामिनावरील निर्णय राखून ठेवला होता.