“ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप, मग वैद्यकीय चाचणी का केली नाही?”, उच्च न्यायालयात एनसीबीवर प्रश्नांचा भडीमार

आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीत एनसीबीवर प्रश्नांचा भडीमार झालाय.

arbaaz merchant on aryan khan in jail
अरबाझ मर्चंट आणि आर्यन खान (संग्रहित छायाचित्र)

मुंबईतील क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणी अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीत एनसीबीवर प्रश्नांचा भडीमार झालाय. अरबाज मर्चंटची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी हे प्रकरण कोणत्याही षडयंत्राचं नसून व्यक्तीगत सेवनाच्या आरोपांचं आहे असं म्हटलं. अटकेच्या मेमोत देखील तसंच म्हटल्याचंही त्यांनी न्यायालयाला सांगितलं. तसेच जर ड्रग्ज सेवन झालं होतं, तर मग आरोपींची वैद्यकीय चाचणी का करण्यात आली नाही? असा प्रश्न देसाई यांनी एनसीबीला विचारला आहे. या सुनावणी वेळी ज्येष्ठ वकील आणि भारताचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी देखील हजर आहेत. त्यांनी मंगळवारी (२६ ऑक्टोबर) आर्यन खानसाठी युक्तवाद केलाय.

या सुनावणीत अरबाज मर्चंटसाठी युक्तीवाद करताना ज्येष्ठ वकील अमित देसाई म्हणाले, “काल मी अटकेच्या मुद्द्यावर बोललो आणि अटकेचा मेमो वाचून दाखवला. ३ ऑक्टोबर रोजी या तिन्ही आरोपींना एकसारख्याच गुन्ह्यांसाठी अटक केली. त्यावेळी कलम २७ (अ) आणि २९ लावण्यात आले नव्हते. त्यांना केवळ कलम २० (ब) आणि २७ साठी अटक केली होती. या सर्व गोष्टींचा असा अर्थ निघतो की हे तिघे तेथे केवळ ड्रग्ज सेवन करण्यासाठी आले होते. अटकेच्या मेमोत देखील तसंच म्हटलंय.”

“सध्या अटक करणे नियम आणि जामीन अपवाद झालाय”

“जामीन मिळणं हा कायदा आणि नियम आहे, तर तुरूंग हा अपवाद आहे. मात्र, सध्या अटक करणे नियम आणि जामीन अपवाद झालाय. या प्रकरणात कोणतंही षडयंत्र नव्हतं. ही केवळ व्यक्तीगत कृती असताना अटकेची काय गरज होती? दुपारी २ वाजता त्यांना अटक करण्यात आली आणि रात्री ७ वाजता त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. कोठडी मागताना देखील तेव्हा षडयंत्र असल्याचा काहीही उल्लेख नव्हता. नंतर हे ८ लोकांचं षडयंत्र असल्याचा दावा करण्यात आला आणि आता २० लोकांचं षडयंत्र असल्याचा दावा केला जातोय,” असंही अमित देसाई यांनी सांगितलं.

“ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप होता, मग वैद्यकीय चाचणी का केली नाही?”

“न्यायालयाने एनसीबीच्या मागणीनुसार आरोपींना ७ ऑक्टोबरपर्यंत कोठडी दिली. मात्र, आजपर्यंत षडयंत्र केल्याप्रकरणी एकालाही अटक करण्यात आलेली नाही. षडयंत्र हा एक स्वतंत्र गुन्हा आहे. पंचनाम्यात देखील हे प्रकरण केवळ व्यक्तीगत ड्रग्ज सेवनाचं असल्याचं म्हटलं आहे. अटकेच्या मेमोत देखील व्यक्तीगत सेवनाचाच आरोप आहे. जर ड्रग्ज सेवनाचा आरोप होता, तर मग आरोपींची वैद्यकीय चाचणी का करण्यात आली नाही?” असा सवाल देसाई यांनी विचारला.

मंगळवारी (२६ ऑक्टोबर) आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जांवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये आर्यन खानच्या जामीन अर्जावरची सुनावणी पूर्ण झाली. अरबाज मर्चंटच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू होती. मात्र, कोर्टाचं कामकाज पूर्ण झाल्यानंतर यावर बुधवारी (२७ ऑक्टोबर) दुपारी सुनावणी ठेवण्यात आली.

आतापर्यंत नेमकं काय झालं?

२ ऑक्टोबरला एनसीबीनं मुंबईत कॉर्टेलिया क्रूझवर छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईदरम्यान, एनसीबीनं एकूण ८ लोकांना अटक केली. अटकेची कारवाई झाल्यापासून हे सर्वजण तुरुंगातच असून त्यांच्या जामीन याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मुंबईतील विशेष न्यायालयामध्ये यासंदर्भात सुनावणी सुरू असताना मंगळवारी (२६ ऑक्टोबर) दोन आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणामध्ये पहिल्यांदाच आरोपींना जामीन मिळाला.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज विशेष एनडीपीएस न्यायालयाने फेटाळून लावले होते. त्यानंतर या तिघांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली. त्यांच्या अर्जांवर आज (२७ ऑक्टोबर) सुनावणी झाली. दुसरीकडे एनडीपीएस न्यायालयात देखील या प्रकरणातील इतर आरोपींच्या जामीन अर्जांवर सुनावणी सुरू आहे. याच सुनावणीमध्ये दोन आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

विशेष एनडीपीएस न्यायालयाकडून कुणाला जामीन मंजूर?

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, मनीश राजगरिया आणि आविन साहू या दोघा आरोपींना विशेष एनडीपीएस न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात जामीन मिळालेले ते पहिलेच आरोपी आहेत. यातील एक सहआरोपी मनिष राजगरियाचे वकील अजय दुबे यांनी पत्रकारांना याची माहिती दिली आहे. मुंबई शहरातील विशेष एनडीपीएस न्यायायाने मनीष राजगरियाला जामीन मंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aryan khan drugs case hearing in mumbai high court mukul rohatgi amit desai present pbs

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!