राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते  व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी २ ऑक्टोबर रोजी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) कोर्डेलिया क्रूझवर पार्टी करण्यासाठी अंमलीपदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसहीत आठ जणांना अटक केल्याप्रकरणी पुन्हा एकदा शंका उपस्थित केलीय. यावेळेस नवाब मलिक यांनी थेट एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर भाजपा नेत्याशी चर्चा केल्याचे आरोप केले असून या चर्चेनंतर दोन व्यक्तींना सोडून देण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय.

नक्की वाचा >> प्रसारमाध्यमाकंडून प्रसिद्धी मिळावी म्हणून कारवाया करता का?; NCB चे समीर वानखेडे म्हणाले…

या छाप्यासंदर्भातील भाजपा कनेक्शनबद्दल मलिक यांनी शंका उपस्थित करताना एक पत्रकार परिषद घेतली होती. मात्र त्यानंतर एनसीबीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. मात्र आता मलिक यांनी आपण पुन्हा उद्या म्हणजेच ९ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. यावेळी आपण एनसीबीने भाजपा नेत्याच्या मेहुण्याला या क्रूझवरुन ताब्यात घेऊन एनसीबीच्या ऑफिसला आणून दोन तासांनी कसं सोडून देण्यात आलं त्यासंदर्भातील व्हिडीओ पुरावे सादर करणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच समीर वानखेडे यांची या प्रकरणातील भूमिकेबद्दल मलिक यांनी शंका उपस्थित केलीय.

एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी या कारवाईनंतर केलेल्या वक्तव्यावरुन नवाब मलिक यांनी ही शंका उपस्थित करताना याबद्दल मोठा खुलासा आपण करणार असल्याचं म्हटलं आहे. “समीर वानखेडे यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितलं होतं की आम्ही आठ ते दहा जणांना अटक केलीय. मी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत असताना प्रश्न विचारलेले की एक अधिकारी जो संपूर्ण कारवाईवर लक्ष ठेवतो तो असं वक्तव्य कसं करु शकतो?”, असा प्रश्न मलिक यांनी उपस्थित केलाय.

तसेच पुढे बोलताना मलिक यांनी, “एकतर आठ लोक असतील नाहीतर दहा. जर दहा लोक असतील तर दोन लोकांना सोडण्यात आलंय असं मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं. त्याबद्दल उद्या पत्रकार परिषद घेणार आहे. ज्या दोन लोकांना सोडण्यात आलं त्याबद्दल व्हिडीओसहीत पुरावे सादर करणार आहे,” असं म्हटलं आहे.

तसेच पुढे बोलताना ज्या दोन लोकांना सोडण्यात आलं, “त्या दोन लोकांपैकी एकजण हा भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा मेहुणा त्यामध्ये आहे. भाजपाच्या कोणत्या नेत्यांच्या सांगण्यावर त्यांना सोडण्यात आलं. समीर वानखेडे कोणाकोणाशी बोलत होते? असा प्रश्न निर्माण होत आहे,” असंही मलिक म्हणाले आहेत. “त्या दिवशी वानखेडे यांनी सांगितलं होतं की क्रूझवरुन आठ ते दहा लोक पकडले गेले. याचा अर्थ ते दोन लोकांना सोडण्याच्या तयारीत होते. ते बोलताना आकडा बोलून गेले. जे दोन लोक सोडण्यात आलेत त्यांना एनसीबीच्या कार्यालयामध्ये दोन बॅगांसहीत घेऊन जाण्यात आलं. काही तासांनी दोन लोक आली आणि त्या दोघांना घेऊन गेले. या साऱ्याचे व्हिडीओ पुरावे मी उद्या सादर करणार आहे,” असं मलिक यांनी सांगितलं आहे.

नक्की वाचा >> Aryan Khan Drugs Case: “वानखेडे साहेबांनी…”; भाजपा नेत्याने केला NCB कनेक्शनसंदर्भातील खुलासा

दहा असताना आठ ते दहा का सांगण्यात आलं? दोन लोकांना का सोडण्यात आलं. त्यांचं समीर वानखेडेंशी काय कनेक्शन आहे? भाजपाच्या कुठल्या नेत्याच्या बोलण्यावर त्यांना सोडण्यात आलं?, असे प्रश्न आपण उद्या पुराव्यानिशी उपस्थित करणार असल्याचं मलिक यांनी म्हटलंय.