कोण आहेत सुनील पाटील? नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट; सॅम डिसोजाचंही सांगितलं कनेक्शन!

मोहीत कंबोज यांचे आरोप फेटाळून लावतानाच नवाब मलिक यांनी सुनील पाटील देखील प्रायव्हेट आर्मीचा सदस्य असल्याचा आरोप केला आहे.

NCP-Nawab-Malik-NCB-Sameer-Wankhede1

आर्यन खानच्या अटकेपासून मुंबईत सुरू झालेलं ड्रग्ज प्रकरण अद्याप शांत होण्याचं नाव घेत नाहीये. त्यामध्ये रोज नवनवीन खुलासे आणि ट्विस्ट येत आहेत. एकीकडे शनिवारी भाजपाचे नेते मोहीत कंबोज यांनी या प्रकरणावरून नवाब मलिक यांच्यावर टीका केली असताना संध्याकाळी विजय पगारे नावाच्या एका व्यक्तीने सुनील पाटील नावाच्या व्यक्तीचा या संपूर्ण प्रकरणातला महत्त्वाचा सहभाग असल्याचा घटनाक्रम सांगितला. यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सुनील पाटील आणि सॅम डिसोजा यांच्याविषयी गंभीर आरोप करतानाच मोहीत कंबोज यांना देखील लक्ष्य केलं.

सुनील पाटील प्रायव्हेट आर्मीचा सदस्य!

मोहीत कंबोज यांनी नाव घेतलेली सुनील पाटील ही व्यक्ती समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीची सदस्य असल्याचा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. सुनील पाटील यांच्यामार्फतच आर्यन खानच्या अटकेची पूर्ण योजना आखून तिची अंमलबजावणी करण्याच आल्याचा आरोप मोहीत कंबोज यांनी केला आहे. त्यावर नवाब मलिक यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत पलटवार केला आहे. “माझ्याकडे विजय पगारेही आले होते. त्यांनी लीला हॉटेलमधल्या काही गोष्टी मला सांगितल्या. मनीष भानुशाली, धवल भानुशाली, सॅम डिसुजा द ललित हॉटेलमध्ये तिथे मजा करायचे. वानखेडेंना वाटलं की ही गोष्ट उद्या सांगितली जाणार आहे तर कंबोजच्या माध्यमातून आधीच सांगुयात. म्हणून काल पत्रकार परिषद घेण्यात आली”, असं नवाब मलिक म्हणाले.

“सुनील पाटीलला मी आयुष्यात कधी भेटलो नाही. तो राष्ट्रवादीचा कोणताही कार्यकर्ता नाही. सुनील पाटीलचे अमित शाहांसोबतचे अनेक व्हिडीओ फिरत आहेत. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या वेळचे फोटो आहेत. मनीष भानुशालीचे पंतप्रधानांपासून सर्वांसोबत फोटो आहेत. सुनील पाटील देखील फ्रॉड आहे. सुनील पाटील देखील वानखेडेंच्या प्रायव्हेट आर्मीचा खेळाडू आहे. ६ तारखेला माझ्या पीसीनंतर सुनील पाटीलचा फोन आला होता. मी तुम्हाला पत्रकार परिषदेसंदर्भात अधिक माहिती देऊ इच्छितो असं त्याने सांगितलं. दुसऱ्या पत्रकार परिषदेनंतर देखील त्यांनी फोन केला. मी त्याला मुंबईत येऊन पोलिसांना सर्व सांगायला सांगितलं. तो येणार होता, पण आला नाही”, असा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला.

सॅम नव्हे, सॅनविल डिसोजा!

दरम्यान, या प्रकरणात चर्चेत आलेला सॅम डिसोजा याचं खरं नाव सॅनविल डिसोजा असल्याचं नवाब मलिक यावेळी म्हणाले. “सॅम डिसोजा कोण आहे याचीही तुम्ही थोडी माहिती घ्या. तो सॅम डिसोजा नसून सॅनविल डिसोजा आहे. वीड बेकरी केस झाली होती, ज्यात सचिन टोपे आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली होती. त्या प्रकरणाता पाचवा आरोपी सॅम डिसोजा आहे. त्याच्या गुगल पेमधून सचिन टोपेच्या पत्नीला पेमेंट झाल्याचे पुरावे आहेत. २३ जूनला सॅम डिसोजाला एनसीबीच्या कार्यालयात भेटण्याची नोटीसही दिली गेली होती”, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aryan khan drugs case nawab malik press conference targets mohot kamboj pmw

Next Story
नवाब मलिकांचा आणखी एक खुलासा; समोर आणली एनसीबी अधिकारी आणि सॅम डिसूझाची ऑडिओ क्लिप
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी