शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणाला रोज नवे वळण मिळताना दिसत आहे. या प्रकरणातील फरार साक्षीदार किरण गोसावी याने आता पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याची तयारी दर्शवली आहे. सोमवारी किरण गोसावी यांचे मोठे वक्तव्य समोर आले असून, ३० मिनिटांत पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असल्याचा दावा किरणने केला होता. किरण गोसावी यांच्यावर बॉडीगार्ड प्रभाकर साईलाचा आरोप आहे की गोसावी आणि सॅम यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना २५ कोटी रुपये देण्याचे सांगितले होते. त्यावरही गोसावी यांनी प्रत्युत्तर दिले होते.

गोसावीने मी अर्ध्या तासात महाराष्ट्राबाहेर आत्मसमर्पण करत आहे. सर्व काही स्पष्ट होईल असे म्हटले होते. त्याचवेळी प्रभाकर साईलने केलेल्या आरोपावर गोसावीने, सर्व आरोप खोटे असून पोलीस आणि एनसीबीने याची चौकशी करावी आणि सत्य बाहेर यावे, अशी माझी इच्छा आहे. प्रभाकरचे नेत्यासोबत संबंध असल्याने तो असे आरोप करत आहे, असे म्हटले होते. त्यावर आता पंच प्रभाकर साईलने पत्रकार परिषद घेत किरण गोसावीने केलेल्या आरोपांवर उत्तर दिले आहे.

“नेत्यांसोबत माझे संबंध कसे असू शकतात? मी सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्यावर एकही गुन्हा दाखल नाही. माझे नेत्यांसोबत असण्याचा प्रश्न कुठून आला. मी जे काही उघडकीस आणतो आहे त्यामुळे मला बदनाम करण्याचा डाव सुरु आहे. त्यांना आत्मसमर्पण करु द्या मग मी माझ्याकडे आणखी काहीतरी आहे ते तुम्हाला सांगेन,” असे प्रभाकर साईन यांनी म्हटले आहे.