आर्यन खानला जामीन नाहीच

न्यायालयाने आर्यनच्या व्हॉट्सअ‍ॅप संदेशांचा दाखला दिला. आर्यन आणि अन्य दोन आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग सकृतदर्शनी गंभीर आहे

मुंबई : क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन हा नियमितपणे अमलीपदार्थाबाबतच्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होता आणि त्याचा अमलीपदार्थ विक्रेते आणि पुरवठादारांशी संबंध होता, असे निरीक्षण नोंदवून विशेष सत्र न्यायालयाने बुधवारी त्याला जामीन देण्यास नकार दिला. अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही  जामीन अर्ज फेटाळला.

न्यायालयाने आर्यनच्या व्हॉट्सअ‍ॅप संदेशांचा दाखला दिला. आर्यन आणि अन्य दोन आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग सकृतदर्शनी गंभीर आहे. त्यामुळे जामिनावर असताना तो अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा करणार नाही हे म्हणता येऊ शकत नाही, शिवाय एनसीबीने प्रकरणाशी संबंधित सादर केलेली कागदपत्रे आणि आर्यन, अरबाज यांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर स्वेच्छेने दिलेल्या जबाबानुसार त्यांनी सेवनासाठी अमलीपदार्थ बाळगल्याचे कबूल केले होते. यावरून अरबाजच्या बुटातून हस्तगत केलेल्या अमलीपदार्थाबाबत त्याला माहिती होती हेच स्पष्ट होते. या बाबी लक्षात घेता आरोपींना जामीन देता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले.

केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) सादर केलेल्या पुराव्यांतून आर्यनसह या प्रकरणी अटक करण्यात आलेले सगळे आरोपी हे कटात सहभागी असल्याचे सकृतदर्शनी सहभागी असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे एनडीपीएस कायद्यानुसार कटात सहभाग असल्याचे कलम त्यांना लागू होते असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. तसेच आरोपींनी हा गुन्हा केलेला नाही असे या टप्प्यावर मानणे शक्य नसल्याचेही स्पष्ट केले.

उच्च न्यायालयात धाव

विशेष न्यायालयाच्या निर्णयानंतर काही वेळातच आर्यनच्या वकिलांनी त्याच्या जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर बुधवारी याचिका सादर करण्यासाठी आर्यनच्या वकिलांनी प्रयत्नही केला. मात्र न्यायालय उपलब्ध होऊ न शकल्याने याचिका गुरुवारी सादर करण्यात येणार आहे. तसेच  याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली जाणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aryan khan has no bail arrested in a drug party on a cruise akp

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!