दरवाजे न उघडल्याने वातानुकूलित लोकल प्रवाशांसकट थेट मध्य रेल्वेच्या कळवा कारशेडमध्ये दाखल झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या घटनेची माहिती प्रवाशाने रेल्वे प्रशासनाला ट्विटरवर दिली. कारशेडमध्ये गेल्यानंतर बऱ्याच वेळाने या गाडीचे दरवाजे उघडले आणि प्रवाशांनी कळवा कारशेडमधून पायपीट करीत कळवा गाठावे लागले. दरम्यान, वातानुकूलित लोकलचे दरवाजे उघडल्याचा दावा, गार्डने केला असून सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रण तपासून चौकशी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

हेही वाचा >>> मुंबई : लोकल प्रवासातील प्रवाशाचे वर्तमान स्थान समजणार ; मध्य रेल्वेच्या यात्री ॲपमधील नवीन वैशिष्ट्य

सीएसएमटी स्थानकातून शुक्रवारी रात्री १०.२० वाजता लोकल ठाण्याच्या दिशने निघाली. एक तासाने ही लोकल ठाणे स्थानकात पोहोचली. मात्र या लोकलचे स्वयंचलित दरवाजे दरवाजे उघडलेच नाहीत. दरवाजे न उघडताच ही लोकल कळवा कारशेडच्या दिशेने रवाना झाली. या लोकल कारशेडमध्ये पोहोचल्यानंतर बऱ्याच वेळाने दरवाजे उघडले. त्यामुळे प्रवाशांना अंधारातच रुळावरून पायपीट करीत कळवा स्थानक गाठावे लागले. त्यानंतर प्रवासी ठाण्याला रवाना झाला. मात्र याबाबत माहिती मिळाल्यानंतर गार्डने दरवाजे उघडल्याचा दावा केल्याचे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले. मात्र प्रवाशांची तक्रार पाहता अशी घटना घडली का आणि नेमके काय झाले हे पाहण्यासाठी सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रण तपासण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> मुंबई : ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ची चाचणी सप्टेंबर अखेरीस ?

महत्त्वाच्या घटना
सीएसएमटीला जाणाऱ्या एका जलद वातानुकूलित लोकलचे दरवाजे उघडलेच नसल्याची घटना दादर स्थानकात १२ जुलै २०२० रोजीसकाळी ७.३० च्या सुमारास घडली होती.

२८ जुलै रोजी दुपारी २ नंतर चर्चगेट-विरार लोकलचे दरवाजे विविध स्थानकांत उघडलेच नाहीत.