scorecardresearch

राहुल गांधी सभेसाठी येत असतील तर काही नाही, आम्ही आलो तर कलम १४४ : असदुद्दीन ओवेसी

असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लीम आरक्षणाच्या मागणीसाठी आयोजित केलेल्या तिरंगा रॅलीत राहुल गांधी, राज्यातील महाविकास आघाडी सरकार, मोदी सरकारवर सडकून टीका केलीय.

राहुल गांधी सभेसाठी येत असतील तर काही नाही, आम्ही आलो तर कलम १४४ : असदुद्दीन ओवेसी

ऑल इंडिया मुस्लीम इत्तेहादूल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लीम आरक्षणाच्या मागणीसाठी आयोजित केलेल्या तिरंगा रॅलीत राहुल गांधी, राज्यातील महाविकास आघाडी सरकार, मोदी सरकारवर सडकून टीका केलीय. एमआयएमच्या सभेला परवानगी नाकारल्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी राहुल गांधी यांची सभा असेल तर काही नाही, पण आम्ही आलो तर कलम १४४ लावला जातो, असा आरोप केला. तसेच शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचं मन केवळ मराठ्यांसाठी धडधडतंय का? असा सवालही केला. ते मुंबईतील तिरंगा रॅलीच्या सभेत बोलत होते.

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, “राहुल गांधी सभेसाठी येणार असतील तर काही नाही, पण आम्ही आलो तर लगेच कलम १४४ लावला जातो. किती कलम १४४ लावाल? बीएमसीची निवडणूक देखील रोखाल का? महाराष्ट्राच्या निवडणुका देखील बंद करणार का? ओमायक्रॉन विषाणू येतो आहे असं म्हणता, मग मुंबईत किती जिनोम सिक्वेंसिंग झालंय हे सांगा. संपूर्ण भारतात १ टक्के देखील जिनोम सिक्वेंसिंग झालेलं नाही. मुंबईत ४५ वर्षांवरील किती नागरिकांना लसीचे दोन डोस मिळाले हे सांगा. जे डॉक्टर, नर्सेस यांना दोन डोस घेऊन ७ महिने झालेत, त्यांना बुस्टर डोस दिला पाहिजे. मात्र, मोदींना, उद्धव ठाकरे यांना त्याची काळजी नाही.”

“बुस्टर डोससाठी एम-आरएनएच्या फायझर किंवा मॉडर्ना लसीच हव्यात”

“तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे बुस्टर डोस हा कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिनचा असू शकत नाही. बुस्टर डोससाठी एम-आरएनएच्या (M-RNA) केवळ फायझर किंवा मॉडर्ना लसीच असतील. असं असताना मोदी देश चालवत आहेत, पण फायझर आणि मॉडर्नासोबत भांडण सुरू आहे. करोनाची तिसरी लाट येऊ नये असंच आम्हाला ही वाटतं, पण बुस्टर डोस लावणं सरकारचं काम आहे. मी तर मुस्लिमांमध्ये बुस्टर डोस लावूनच थांबणार आहे,” असं असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितलं.

“विधानसभेत सर्व आमदार एकत्र बसतात तेव्हा ओमायक्रॉन दिसणार नाही”

“नागपूरमध्ये विधानसभेचं अधिवेशन होणार आहे. एमआयएमच्या आमदारांनी तेथे आंदोलनाचं नियोजन केल्यास मी तिथंही येण्यास तयार आहे. जेव्हा विधानसभेत सर्व आमदार एकत्र बसू शकतात तेव्हा ओमायक्रॉन दिसणार नाही,” असंही मत व्यक्त केलं.

“शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचं मन केवळ मराठ्यांसाठी धडधडणार का?”

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, “प्राथमिक शाळेत २३ टक्के मुस्लीम मुली आहेत, माध्यमिक शाळेत येईपर्यंत ही संख्या १२ टक्के होते. दहावीपर्यंत ११ टक्के, उच्च माध्यमिकपर्यंत ६ टक्के असं प्रमाण खाली जात आहे. असं असतानाही कुणीच आरक्षणाविषयी बोलणार नाही. ही माझी आकडेवारी नाही, तर महाराष्ट्र सरकारची आकडेवारी आहे. महाराष्ट्रात ८३ टक्के मुस्लिमांकडे जमीन नाही. ते भूमिहीन आहेत. दुसरीकडे केवळ १ टक्के मराठ्यांकडे जमीन नाही. १ टक्के आणि ८३ टक्के यात सांगा कोणता न्याय आहे?”

हेही वाचा : “वाशीत मला वाटलं मी खासदार आहे की दहशतवादी, कारण…”, इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप

“शरद पवार यांचं मन केवळ मराठ्यांसाठी धडधडणार आहे का? उद्धव ठाकरे यांचं मन काय केवळ मराठ्यांसाठी धडधडणार आहे का? काँग्रेसचं मन केवळ मराठ्यांसाठी धडधडणार आहे का? न्याय कमकुवतांसोबत झाला पाहिजे, मजबुत असणाऱ्यांबरोबर नाही. न्याय करताना जो जमिनीवर पडलाय त्याच्यावर चर्चा व्हायला हवी. जे आधीच आकाशात आहेत त्यांना आणखी वर कुठं घेऊन जाणार आहात? मात्र हे बोलणार नाहीत,” असं ओवेसी यांनी सांगितलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-12-2021 at 22:41 IST

संबंधित बातम्या