गावखेड्यात, शहरात कधी अंगणवाडी सेविका तर कधी आशा सेविका म्हणून दारावर येणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्यात डोकावण्याची संधी देणारा, त्यांच्या कामाचं आपल्याला सहज लक्षात न येणारं महत्त्व अधोरेखित करणारा आणि कामापलीकडचं त्यांचं जगणं उलगडून सांगणारा ‘आशा’ हा चित्रपट सध्या राज्यभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. सर्वसामान्यांशी जोडल्या गेलेल्या ‘आशां’ची कथा चित्रपटरूपात का सांगावीशी वाटली ते चित्रिकरणादरम्यान आलेले अनुभव या चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक पाटील, निर्मात्या दैवता पाटील, चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेत्री शुभांगी भुजबळ यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला दिलेल्या भेटीदरम्यान सांगितले.
‘आशा’ सेविकांवर चित्रपट करायचाच असं ठरवून काही कथालेखन केलं नव्हतं, असं स्पष्ट करतानाच या चित्रपटाची प्रेरणा कशी मिळाली याचा किस्सा दिग्दर्शक दीपक पाटील यांनी सांगितला. ‘सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यातही नाट्य असतं. कोणतीही स्त्री कामासाठी घराबाहेर पडते तेव्हा तिचा आत्मविश्वास, तिच्या बोलण्याची, कामाची पद्धत वेगळी असते. असंच उत्तर महाराष्ट्रात एक शिबीर घेत होतो, त्यावेळी २२ वर्षांची एक आशा सेविका स्वत:विषयी भरभरून बोलत होती. आशा सेविका म्हणून काम करणं सोपं नाही, एसटीतून फिरणं, कामासाठी सतत घराबाहेर असणं, यावरून मग सासू किंवा नवऱ्याबरोबर होणारे छोटे मोठे वाद हे सगळं तिने सांगितलं, पण त्यानंतर ती जे म्हणाली ते खूप महत्त्वाचं होतं. ‘मी हे काम फक्त पैशासाठी करत नाही. आत्तापर्यंत मी या गावात कोणाची तरी सून, कोणाची तरी पत्नी म्हणून ओळखली जात होते. मात्र, जेव्हापासून मी ही निळी साडी घालून गावात काम करायला लागले तेव्हापासून सगळे जण मला ‘आशा ताई’ म्हणून हाक मारतात. आता ही माझी ओळख बनली आहे’ असं तिने सांगितलं. आणि त्या क्षणी मला वाटलं की ही खरी नायिका आहे. तिच्यावर चित्रपट व्हायला हवा, इथून या चित्रपटाची खरी सुरुवात झाली, असं दीपक यांनी सांगितलं.
रिंकू राजगुरूच का?
या चित्रपटाची नायिका मालती हिचं पात्र एकदम आत्मविश्वासाने भरलेली, स्पष्टवक्ती, पंगा घेणारी, पण उद्धटही नाही, अशा पद्धतीने खुलत गेलं. या सगळ्या चौकटीत अभिनेत्री म्हणून रिंकू एकदम चपखल बसत होती. फक्त तिचा होकार मिळणार की नाही ही शंका होती, पण तिनेही कथा ऐकल्यावर लगेचच होकार दिला, अशी आठवण दीपक यांनी सांगितली.
आशा म्हणजे आंदोलन…
‘देशभरात साडेतेरा लाख आशा सेविका आहेत आणि महाराष्ट्रातच जवळपास ८५ हजारांहून अधिक आशा सेविका आहेत. मात्र, त्यांच्यावर साधा माहितीपटही नाही. आशा सेविका म्हणजे आंदोलन, पगार याच गोष्टी आठवतात, अर्थात त्यांच्या मूलभूत मागण्यांसाठी त्या लढा देतात. पण त्यापलीकडे एक व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे कधीही पाहिलं जात नाही. आशा म्हणजे फक्त आरोग्य सेविका नाही, घराघरात कुठे वाद असेल, कोणाला शिक्षण घेण्यात काही अडचण येत असेल, अशा कैक समस्यांविषयी लोक त्यांच्याकडे व्यक्त होतात. आणि या आशा सेविका त्यांना वेगवेगळ्या विषयांवर समुपदेशन करतात. त्यांच्या या एकूणच कामाचं स्वरूप, त्यांना येणाऱ्या अडी-अडचणीत नाट्य आहेच. शिवाय, एक व्यक्ती म्हणून तिचं आयुष्य, त्यांच्या समस्या या सगळ्या गोष्टी सिनेमा माध्यमातूनच रंजकतेने लोकांसमोर आणता येतील, हा विश्वास वाटला, असंही दीपक यांनी स्पष्ट केलं.
महिला निर्माती असण्याचा सिनेमाला फायदा
या चित्रपटाच्या निर्मात्या दैवता पाटील यांनी ‘आशां’वर माहितीपट बनवण्यापेक्षा चित्रपट माध्यमच योग्य का वाटलं, याबद्दलची भूमिका स्पष्ट करताना महिला निर्माती असण्याचा सिनेमाला कसा फायदा होतो हेही थोडक्यात सांगितलं. ‘आशा सेविका या आरोग्यक्षेत्रातील ज्ञान आणि माहितीकोश आहेत, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. माहितीपटांच्या माध्यमातून आशा सेविकांचं जगणं मांडलं तर ते उपदेशाच्या पलीकडे जाणार नाही. माहितीपटाचा प्रेक्षकवर्गही मर्यादित असतो. त्यांचं जगणं हे घराघरात पोहोचलं पाहिजे, हा हेतू असल्याने माहितीपट किंवा लघुपटापेक्षा सिनेमासारख्या रंजक माध्यमातून ते मांडणं अधिक योग्य वाटलं. शिवाय, कथेतील स्त्री पात्रांकडे पाहण्याचा, त्यांचं जगणं लोकांपर्यंत पोहोचवणारा विषय हाताळताना महिलांचा दृष्टिकोन भिन्न असतो. म्हणूनच बहुदा मी पटकन निर्माती म्हणून या चित्रपटामागे उभं राहण्याचा निर्णय घेतला. महिला निर्माती असेल तर निश्चितच त्याचा फायदा सिनेमाला होतो, असं त्यांनी सांगितलं.
धुळ्यातील अनुभव
‘या चित्रपटाचं चित्रीकरण धुळे जिल्ह्यात साखरी तालुक्यात झालं आहे. तिथे अहिराणी भाषा बोलली जाते. मी पहिल्यांदाच धुळ्याला गेले होते, त्यामुळे तिथलं हवामान, लोकांचं राहणीमान, भाषा, खाणंपिणं सगळंच वेगळं होतं. तिथे चित्रीकरणही पहिल्यांदाच झालं होतं. तर लोकांमध्ये उत्सुकता होती, पण त्यांनी कधी आम्हाला त्रास दिला नाही किंवा चित्रिकरणादरम्यान लुडबुड केली नाही. अतिशय शांतपणे ते चित्रीकरण पाहात असायचे. आमच्या सेटवर जेवण असायचं, पण तरीही गावातून आम्हाला खाद्यपदार्थ पाठवले जायचे, अनेकांच्या घरी आम्ही जेवलो. त्यामुळे आपल्या घरचं कार्य असावं, अशा पद्धतीने गावकऱ्यांनी आम्हाला सांभाळून घेतलं’, अशी आठवण अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने सांगितली.
चित्रिकरणासाठी वेळेची शिस्त हवी…
सध्या आठ तास चित्रीकरण शेड्यूल असावं अशी मागणी जोर धरते आहे. ती का महत्त्वाची आहे, याबद्दलचं मत चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्री शुभांगी भुजबळ यांनी मांडलं. ‘मालिकांच्या चित्रिकरणामध्ये वेळेची शिस्त आणली गेली पाहिजे. बारा तासाचं शेड्युल असलं तरी सहज तेरा-चौदा तास काम चालतं. त्यानंतर पुन्हा सेटवर येणंजाणं लक्षात घेतलं तर १६ तासापेक्षा अधिक तास आम्ही बाहेर असतो. परत आदल्या दिवशीचं उशिरापर्यंतचं हे चित्रीकरण आटपून पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही सेटवर येतो तेव्हा कलाकाराने एकदम ताजंतवानं असलं पाहिजे आणि त्याच उत्साहाने काम करायला सुरुवात करावी, अशी अपेक्षा असते. कुठेतरी या सगळ्याला शिस्त यायला हवी, असं तिने सांगितलं. तर कलाकारांना वैयक्तिक आयुष्य जपण्यासाठीही वेळ मिळायला हवा, असं आग्रही मत रिंकूने व्यक्त केलं.
प्रत्येक चित्रपटासाठी निकष वेगळे…
‘सैराट’नंतर प्रत्येक चित्रपट निवडताना काही एक निकष समोर ठेवले होते, असं रिंकूने सांगितलं. ‘कथा चांगली आहे का? आणि त्यातून माझी व्यक्तिरेखा कशी आहे? प्रेक्षकांना काय देता येतं आहे, हे मी पाहते. पण, ‘झिम्मा’ चित्रपटाचा विचार केला तर त्यात इतक्या मोठमोठ्या अभिनेत्री होत्या. त्यात माझ्या वाट्याला छोटी भूमिका आली असती तरी मला त्या चित्रपटाचा भाग व्हायची इच्छा होती. त्यामुळे कुठल्या पद्धतीने चित्रपट समोर येईल त्यानुसार निकष बदलत जातात. दुसरं म्हणजे चित्रपट चालला किंवा नाही चालला तरी मागच्या कामाचा ताण घेऊन पुढचं काम सुरू करत नाही. एखादी व्यक्तिरेखा केली किंवा त्या पद्धतीची कथा केली, तर पुढच्या वेळी पुन्हा तेच करण्यात मला रस वाटत नाही. दरवेळी नवीन पद्धतीने लोकांसमोर कशी येईन यावर माझा अधिक भर असतो’, असं रिंकूने सांगितलं.
सावित्रीबाई फुले हे तमाम स्त्रियांसाठी आशादायी व्यक्तिमत्त्व. प्रत्येकालाच जगताना कोणी ना कोणी प्रेरणादायी, आशादायी व्यक्तिमत्त्व समोर असावं असं वाटतं. महाराष्ट्रातील तमाम स्त्रियांसाठी सावित्रीबाई फुले हे खूप आशादायी व्यक्तिमत्त्व वाटतं, असं सावित्रीबाईंवर राज्यभरात विविध भाषेत नाटक सादर करणाऱ्या शुभांगीने सांगितलं. ‘अतिशय अवघड अशा काळात सावित्रीबाईंनी फक्त स्त्री शिक्षणाची सुरुवात केली असं नाही. तर त्या काळात जोतिबांच्या साथीने त्यांनी बालहत्या प्रतिबंधगृह सुरू केलं. विधवा गर्भवती महिलांना आपल्या घरात घेतलं, त्यांची बाळंतपणं केली, त्यांच्या मुलांना वाढवलं, त्यातल्याच एका मुलाला दत्तक घेतलं. त्यांनी अनंत अडचणी सोसून इतकं मोठं कार्य उभारलं, त्यामुळे जेव्हा कधी मला खचल्यासारखं वाटतं, तेव्हा मी माझ्या सावित्रीबाईंवरच्या नाटकाची संहिता वाचायला घेते. मला पुन्हा त्यांच्याकडून प्रेरणा मिळते, मनाला एक उभारी येते’, असं तिने सांगितलं.
