मुंबई: आषाढी वारीसाठी पंढरपूरला १० मानाच्या पालख्या ज्या मार्गावरून जातात त्या मार्गावरून जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना पथकारातून सूट देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याविषयीचे परिपत्रक जारी करण्यात आले असून ६ जुलै २९ जुलै या कालावधित वारकऱ्यांच्या वाहनांना ही सवलत लागू राहणार आहेत. त्याचप्रमाणे वारीमार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, वाहतूक व्यवस्थापन करण्याचे निर्देश देतानाच पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सरकारने दिलेल्या सूचनांनुसार आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या मानाच्या पालख्या, वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना ‘आषाढी एकादशी-२०२६’ असा उल्लेख असलेले टोलमाफीचे पास किंवा स्टिकर पोलीस ठाणे, वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हे पास जाण्या-येण्याच्या दोन्ही प्रवासासाठी वैध असतील. सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या अखत्यारीतील संबंधित टोल नाक्यांवर ही टोलमाफी लागू राहणार आहे. टोल नाक्यांवर स्वतंत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे तसेच वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
वारी मार्गावरील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, पुणे-सोलापूर, पुणे-सातारा-कोल्हापूर तसेच पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून रस्ते वाहतुकीस योग्य स्थितीत आणण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. आवश्यक दिशादर्शक फलक उभारण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत. वारीदरम्यान कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्वरित मदत मिळावी यासाठी महामार्गांवर रुग्णवाहिका, क्रेन आणि आवश्यक यंत्रसामग्री तैनात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दर २० ते २५ किलोमीटर अंतरावर संयुक्त पथके उपलब्ध ठेवण्यास सांगण्यात आले आहे. गरज पडल्यास जड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याबाबत परिवहन विभागाने निर्णय घ्यावा, असेही परिपत्रकात नमूद आहे.
एसटी बसेसलाही टोलमाफी
पंढरपूरकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसलाही आवश्यक त्या प्रक्रियेनंतर टोलमाफीची सुविधा देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. यासाठी संबंधित पोलीस ठाणे आणि अन्य यंत्रणांकडून पास घेण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.वारीच्या काळात टोल नाक्यांवर अतिरिक्त मनुष्यबळ, ट्रॅफिक वॉर्डन आणि हँडहेल्ड मशिन्सची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच वाहतूक पोलिसांना आवश्यक सहकार्य करण्यासाठी संबंधित टोल कंत्राटदारांनाही अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे. कंत्राटदारांना या पथकरमाफीची भरपाई शासनाकडून करण्यात येणार आहे.
