मुंबई : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने केलेले नियोजन यशस्वी ठरले. २४ ते २६ जुलै या काळात १०० विशेष आणि नियमित रेल्वेगाड्यांच्या माध्यमातून १ लाख १३ हजार १९७ भाविकांची वाहतूक करण्यात आली. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा प्रवाशांची संख्या; तसेच प्रवासी महसुलातही वाढ झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.
वारीदरम्यान पंढरपूरकडे होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष नियोजन केले होते. २४ जुलै रोजी ३५, २५ जुलै रोजी ३४ आणि २६ जुलै रोजी ३१ अशा एकूण १०० विशेष व नियमित रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या. गेल्या वर्षी याच कालावधीत ९१ गाड्या चालविण्यात आल्या होत्या.
यावर्षी वारीत पंढरपूर स्थानकावर १ लाख १३ हजार १९७ प्रवाशांची नोंद झाली. मागील वर्षी प्रवाशांची संख्या १ लाख १० हजार ०६६ इतकी होती. प्रवासी महसूलही १.०७ कोटी रुपयांवरून १.२७ कोटी रुपयांपर्यंत वाढला असून त्यात सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली.
भाविकांना तिकीट मिळण्यात अडचण येऊ नये म्हणून पाच अतिरिक्त आरक्षण केंद्रे, पाच स्वयंचलित तिकीट विक्री यंत्रे आणि दहा मोबाइल अनारक्षित तिकीट प्रणाली उपकरणे कार्यान्वित करण्यात आली. ‘रेलवन’ ॲपद्वारे मोबाइल तिकीट काढण्यासही प्रोत्साहन देण्यात आले.
गर्दी नियंत्रणासाठी स्थानक परिसरात व्यापक बॅरिकेडिंग आणि स्वतंत्र तात्पुरता निवास क्षेत्राची व्यवस्था करण्यात आली. यावेळी १,३२० चौमीचे अतिरिक्त तात्पुरता निवासी क्षेत्र विकसित करण्यात आले असून, गुड्स शेडवर ३ हजार चौमीचे आच्छादित क्षेत्र उभारण्यात आले. स्वच्छतेसाठी १०४ तात्पुरती शौचालये उभारण्यात आली असून एकूण शौचालयांची संख्या १८८ झाली. तसेच २४ तास स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था ठेवण्यात आली.
सुरक्षेसाठी ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सज्ज कमांड अँड कंट्रोल सेंटर, पाच व्हिडिओ वॉल आणि चार भाषांमधील सार्वजनिक घोषणा प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. वैद्यकीय पथकाने वारीदरम्यान १,२१९ भाविकांवर उपचार केले. याशिवाय सुमारे ११० रेल्वे कर्मचारी, १५० आरपीएफ जवान, १३० रेल्वे पोलीस, ४० नागरी संरक्षण स्वयंसेवक आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांना तैनाती करण्यात आले होते.
विशेष रेल्वेगाड्यांचे वेळेवर संचालन सुनिश्चित करण्यासाठी चार स्क्रॅच रेक्स सज्ज ठेवण्यात आले होते. विविध स्वयंसेवी आणि धर्मादाय संस्थांनी जवळपास एक लाख वारकऱ्यांना मोफत भोजन उपलब्ध केले.
