मुंबई : आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे जात असताना अपघाती निधन झालेल्या वारकऱ्याच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कै. संभाजी हरी पाटील या वारकऱ्याच्या वारसांना ही मदत देण्यात येणार आहे.
आषाढी वारी २०२५च्या कालावधीत पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने ‘विठ्ठल-रुक्मिणी वारकरी योजना २०२५’ लागू केली होती. १६ जून ते १० जुलै २०२५ या कालावधीत वारीशी संबंधित असताना अपघाती निधन झालेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत देण्याची तरतूद करण्यात आली होती. शासनाने पाटील यांच्या वारसांना चार लाख रुपये मदत मंजूर केली आहे. संबंधित रक्कम वितरित करण्याची कार्यवाही कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी करावी, असे निर्देश शासन निर्णयात देण्यात आले आहेत.
वारीदरम्यान वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दरवर्षी महत्त्वाचा ठरतो. लाखो भाविक पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना प्रवासातील अपघात, आरोग्यविषयक अडचणी आणि अन्य जोखमींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत अपघाती मृत्यू झालेल्या वारकऱ्याच्या कुटुंबाला शासनाच्या योजनेतून आर्थिक मदत दिली जाणार आहे.
