मुंबई : शिवसेनेचे (ठाकरे) विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांचा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाला असून त्यांना यावेळी मुंबई महापालिकेची निवडणूक लढवता येणार नाही अशी शक्यता आहे. त्यांच्या प्रभागाच्या आजूबाजूचे प्रभागही महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे या प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी वरळीतील शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. माजी महापौर स्नेहल आंबेकर, तसेच आशिष चेंबूरकर यांच्या पत्नीचेही नाव चर्चेत आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत जाहीर झाली. यावेळी अनेक ज्येष्ठ माजी नगरसेवकांच्या प्रभागात आरक्षण पडले. त्यात आशिष चेंबूरकर यांच्याही मतदारसंघात आरक्षित झाला. चेंबूरकर शिवसेनेमधील (ठाकरे) वरळीतील जुने जाणते, अनुभवी माजी नगरसेवक आहेत. त्यांनी बेस्ट समितीचे अध्यक्षपदही भूषविले होते. वरळीतील प्रभाग क्रमांक १९६ हा त्यांचा प्रभाग. वरळी पोलीस कॅम्प, वरळी बीडीडी चाळ, वरळी डेअरी, कॅम्पा कोला वसाहत, प्रेमनगर आणि सिद्धार्थनगरसारखी शहरातील मोठी झोपडपट्टी असा हा संमिश्र प्रभाग. हा प्रभाग यंदा सर्वसाधारण गटातील महिलांसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे चेंबूरकर यांना निवडणूक लढवणे शक्य होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातील सात प्रभागांपैकी तब्बल पाच प्रभाग महिलांसाठी राखीव झाले आहेत. त्यामुळे बाजूचा प्रभाग मिळणेही त्यांच्यासाठी मुश्कील आहे.

वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून या भागात शिवसेनेची (ठाकरे) बांधणी चांगली आहे. या भागात घराघरात ठाकरे यांचे कार्यकर्ते आहेत. वरळीमध्ये निवडणूक जिंकून येण्याची शक्यता मोठी असल्यामुळे या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यातच आता हे प्रभाग आरक्षित झाल्यामुळे जुन्या अनुभवी प्रस्थापित नगरसेवक आणि नगरसेविकांना आता बदलावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. चेंबूरकर यांच्या प्रभागातूनही इच्छुक महिलांनी आपली राजकीय इच्छा समाजमाध्यमांवरून व्यक्त केली आहे. त्यामुळे हा प्रभाग चर्चेत आला आहे.

याबाबत आशिष चेंबूरकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, २०१२ च्या निवडणुकीच्या वेळीही अशीच स्थिती होती. त्यावेळी किशोरी पेडणेकर यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आरक्षणामध्ये कोणाचाही प्रभाग जाऊ शकतो. आमच्या विभागात कार्यकर्त्यांची कमतरता नाही. माझ्या पत्नीचेही नाव कार्यकर्त्यांनी पुढे आणले आहे. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमचे नेते आदित्य ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असेही ते म्हणाले.