‘मुंबई महानगरपालिकेतील माफियाराजच्या रावणाचे दहन हा भाजपचा अधिकृत कार्यक्रम आहे. ही लढाई आता आणखी तीव्र होईल. सुरुवात त्यांनी केली आहे, शेवट आम्ही करु,’ अशा शब्दांमध्ये मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे.

मुलुंडमध्ये मंगळवारी भाजपचे खासदार किरीट सोमय्यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाच्या दहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र या कार्यक्रमात शिवसैनिकांनी गोंधळ घातला. शिवसैनिकांनी या कार्यक्रमात घुसून रावणाच्या प्रतिकृतीची तोडफोड करत भाजप कार्यकर्त्यांना मारहाणदेखील केली. याच पार्श्वभूमीवर शेलार यांनी सकाळी सोमय्या यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. भ्रष्टाचारविरोधी लढ्यात पक्ष सोबत असल्याचा विश्वास शेलार यांनी सोमय्या यांना दिला.

सोमय्या यांच्या भेटीला गेलेल्या शेलार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत नाव न घेता शिवसेनेवर हल्लाबोल केला. ‘भ्रष्टाचारविरोधी लढाईत आम्ही मागे हटणार नाही. आम्ही त्याविरोधात आवाज उठवत राहणार आहोत. यापुढे ही लढाई अधिक तीव्र होईल. जशास तसे उत्तर दिले जाईल,’ या शब्दांमध्ये शेलार यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. ‘माफियांच्या रावणाचे दहन भाजपने केले. याचा शिवसेनेला एवढा राग येण्याचे कारण काय ?,’ असा टोलादेखील शेलार यांनी लगावला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात भाजपला लक्ष्य केले होते. विशेषत: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी स्वबळाची भाषा करणाऱ्या किरीट सोमय्या आणि आशिष शेलार यांच्यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली. ‘युती तोडून दाखवा, मग सर्जिकल स्ट्राइक कसा असतो ते दाखवतो’, या शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी सोमय्या आणि शेलार यांचे नाव न घेता समाचार घेतला. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.