मुंबई: देशातील संभाव्य कठीण काळ ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही गोष्टीच्या अवास्तव खर्चावर निर्बंध घालण्याचे आवाहन देशवासीयांना केले आहे. फ्रान्स येथील कान्स फेस्टिव्हलमध्ये जाणे तसे महागच. हा खर्च टाळता यावा यासाठी फ्रान्सला न जाण्याचा निर्णय कान्स राज्याच्या एका मंत्र्याने घेतला आहे. एका अर्थाने हा खर्च जास्त असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. मराठी चित्रपटांच्या मदतीसाठी ते ऑनलाइन उपस्थितीत राहणार आहेत. मोदी यांच्या आवाहनानंतर फ्रान्स दौरा रद्द करणारे पहिले मंत्री कोण आहेत ते वाचा.
देश सध्या कठीण परिस्थितीतून जात असताना राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे सांस्कृतिक कार्य तथा इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी यंदाच्या फ्रॉन्स येथील कान्स फिल्म फेस्टिव्हलला न जाण्याचा निर्णय जाहीर केला.
मंत्री ॲङशेलार यांनी सांगितले की, कठीण काळात देशहिताला सर्वोच्च मान देत विभागीय खर्चांमध्ये संयम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अधिकाधिक बैठका व्हर्च्युअल माध्यमातून घेण्यात येणार असून संसाधनांचा मर्यादित वापर करण्यावर भर दिला जाणार आहे.
दरम्यान, कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होणाऱ्या मराठी चित्रपट तसेच त्यासंदर्भातील आवश्यक समन्वय आणि सहकार्यासाठी संबंधित यंत्रणा नियोजित पद्धतीने कार्यरत राहतील, तसेच मराठी सिनेमाला प्रोत्साहन देण्यासाठी जिथे आवश्यकता असेल तिथे आँनलाईन सहभागी होईन, असेही मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.
