भाजपा नेते आशिष शेलार यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना आरे कारशेड, मुंबईतील नाईटलाईफच्या मुद्यावरून टोला लगावला आहे. आता नुकसान सहन करुन मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरवायचे का ? एक दिवस युवराजांनी मला “म्हातारीचा बुट” हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं! असं शेलार यांनी म्हटलं आहे.

“पोलिसांची तयारी नसतानाही नाईटलाईफचा निर्णय लादला. तज्ञ समितीने आरे कारशेडचा दिलेला अहवाल बंधनकारक नाही म्हणे. मग आता नुकसान सहन करुन मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरवायचे का ? एक दिवस युवराजांनी मला “म्हातारीचा बुट” हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं!” असं शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

चार सदस्यीय मेट्रो कारशेड समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेट्रो-३ प्रकल्पासाठी आरे कॉलनीत जागा योग्य असल्याचा अहवाल सादर केला होता. मात्र, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या समितीचा हा अहवाल महाराष्ट्र सरकारसाठी बंधनकारक नसल्याचे म्हटले होते. यावरून शेलार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

आणखी वाचा – आरे कारशेडचा अहवाल बंधनकारक नाही – आदित्य ठाकरे

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या कालवधीत मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील काही जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र, पर्यावरणप्रेमींसह अनेक मुंबईकरांनी या आरे कारशेडला विरोध केला. कारण, या कारशेडसाठी शेकडो झाडांची कत्तल केली जाणर होती. यानंतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आलेल्या महाविकासआघाडी सरकारकडून आरे कारशेडच्या कामास स्थगितीचा निर्णय घेण्यात आला.