मुंबई : झारखंडमधील नोकरभरती परीक्षेतील गैरप्रकारांविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमार व अश्रुधुराच्या माऱ्यावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा तसेच इंडिया आघाडीतील घटक पक्षांवर जोरदार टीका केली. रांचीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन हे रोजगार, परीक्षेतील पारदर्शकता व तरुणांच्या भवितव्याशी संबंधित असूनही राहुल गांधी यांच्यासह महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील नेत्यांना त्याचा आवाज ऐकू येत नसल्याचा आरोप शेलार यांनी मंगळवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत केला. विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या मुद्द्यावरून काँग्रेस झारखंडच्या सरकारमधून बाहेर पडणार का? असा सवाल त्यांनी गांधी यांना केला.
रांचीमध्ये सोमवारी विद्यार्थ्यांनी झारखंड विधानसभेला गराडा घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आंदोलकांना पांगविण्यासाठी लाठीमार व अश्रुधुराचा वापर करण्यात आला. या घटनेचा संदर्भ देत शेलार म्हणाले की, नोकरभरतीत पारदर्शकता आणण्याची मागणी करणारे विद्यार्थी शांतपणे आंदोलन करीत होते. काळ्या यादीतील कंपनीला परीक्षेचे कंत्राट देण्यात आले. तसेच पेपर न लिहिलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका सोडविण्यात आल्या, यावरून विद्यार्थी आंदोलन करत आहेत. मात्र, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शत्रू समजून वागविण्यात आले. तारांचे कुंपण, अश्रुधूर, लाठीमार व बळाचा वापर करण्यात आला. महिला आंदोलकांशीही गैरवर्तन करण्यात आले, असा आरोप शेलार यांनी केला. या घटनेबाबत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन व राहुल गांधी यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.
‘राहुल गांधींनी पळ काढू नये’ संसद अधिवेशनात विरोधकांकडून घातल्या जात असलेल्या गोंधळावरही शेलार यांनी टीका केली. संसद ही लोकांचे प्रश्न सोडविण्याची जागा आहे. विरोधकांनी गोंधळ घालण्यापलीकडे जनहितासाठी काही केलेले नाही. गृहमंत्री अमित शहा संसदेत उपस्थित राहून उत्तर देणार आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी पळ काढू नये. खोटे व विपर्यासाचे राजकारण न करता सत्य ऐकण्याची तयारी ठेवावी व चर्चेत सहभागी होऊन अमित शहांच्या उत्तराला सामोरे जावे, असे आवाहन त्यांनी केले.
आंदोलनाबाबत राहुल गांधी दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप करत शेलार यांनी प्रश्न केला की ‘छात्रों की गुंज म्हणणाऱ्या राहुल गांधींना रांचीची गुंज ऐकू येत नाही का? त्यांनी कानाचे पडदे बंद केले आहेत का? रांचीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर इंडिया आघाडीतील नेत्यांनी मौन बाळगल्याचा आरोपही त्यांनी केला. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत, ‘रांचीतील विद्यार्थी आपले नाहीत का? मातोश्री व शिवतीर्थचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद का आहेत? रांचीतील विद्यार्थ्यांसाठी आवाज उठविण्यासाठी उद्धव ठाकरे रांचीला येणार आहेत का?’ असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकीय सोयीनुसार भूमिका घेतली जात असून विरोधकांचे विद्यार्थ्यांवरील प्रेम हे ‘पुतना मावशीचे प्रेम’ असल्याची टीका करत, रांचीतील आंदोलनाला उशिरा पाठिंबा देणाऱ्या संघटनांवर निशाणा साधत, ‘हे वरातीमागून घोडे आहेत,’ असा टोला लगावला. ‘काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षांना विद्यार्थी, तरुण-तरुणी, रोजगार व परीक्षेतील पारदर्शकतेशी काहीही देणेघेणे नाही. रांचीच्या आंदोलनाकडे पाठ व जंतरमंतरच्या आंदोलनाकडे तोंड, ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे. रांचीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भाजपचा पूर्ण पाठिंबा आहे. आंदोलनादरम्यान संयम सोडणाऱ्या पोलिसांवर कोणत्या पातळीवरून आदेश देण्यात आले, याची स्पष्टता मुख्यमंत्री सोरेन व राहुल गांधी यांनी द्यावी, अशी मागणी शेलार यांनी केली.
‘सीजेपी’ने आता आंदोलनाला समर्थन दिले असेल तर त्याला वरातीमागून घोडे असे म्हणेन. तब्येत बरी नाही, संघटनेची बैठक ही कारणे आंदोलनात सहभागी न होण्याकरिता दिली गेली. ‘सीजेपी’ला १७ दिवस विद्यार्थी हित दिसले नाही. कारण त्यांचा मालक त्यांना फर्मान देत नाही, तोपर्यंत ते बोलत नाहीत. – आशिष शेलार</strong>
