नोटाबंदीच्या निर्णयावरून दररोज वेगळी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. सततच्या बदलत्या भूमिकेचा व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची टीका जिव्हारी लागलेल्या भाजपने शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे. काळ्या पैशाबाबत शिवसेनेने काळ्या पैशाबाबत दुतोंडी भूमिका घेऊ नये. हिंमत असेल तर थेट टोकाची भूमिका घेऊन दाखवावी, असे आव्हानच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिले आहे.
नोटाबंदी व काळ्या पैशाबाबत शिवसेनेने दुतोंडी भूमिका घेतली आहे. हिंमत असेल तर त्यांनी थेट भूमिका घ्यावी. शिवसेना जर काळ्या पैशासोबत असेल तर जनता त्यांना याचा निश्चितच धडा शिकवेल, अशा शब्दांत आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

दरम्यान, नोटाबंदीच्या निर्णयानंतर होणाऱ्या त्रासामुळे लोकांच्या डोळ्यात पाणी आले असताना तुमच्या भावूक होण्याला अर्थ काय, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. इतका मोठा निर्णय घेताना ज्यांनी विश्वासाने निवडून दिले त्यांना विश्वासात घ्यायला हवे होते, असे म्हणत ठाकरेंनी नाव न घेता पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले होते.
‘१२५ कोटी जनतेचा निर्णय एक व्यक्ती घेते. केंद्रातील सरकार लोकांना आपले वाटत नाही. सध्या देशातील सर्व प्रश्न संपले आहेत. फक्त नोटा बदलण्याचे काम राहिले आहे. नोटा बदलण्यासाठी लोकांना बँकांसमोरील रांगांमध्ये उभे राहावे लागत आहे. लोकांना स्वत:च्या कष्टाचा पैसा बँकेतून काढता येणे कठीण झाले आहे. लोकांच्या डोळ्यात पाणी आले असताना तुमच्या भावूक होण्याला अर्थ काय ?,’ असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला होता.