मुंबई : गणेशमूर्ती आगमनाच्या मार्गांची तातडीने पाहणी करून रस्त्यांची स्थिती, आवश्यक दुरुस्ती आणि सुरक्षेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला दिले. गणेशमूर्ती आगमनादरम्यान झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुढील २४ तासांत सर्व आगमन मार्गांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासकीय व्यवस्थेत कोणाचीही कसूर आढळल्यास संबंधितांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असा इशाराही शेलार यांनी दिला.

‘भुलेश्वरचा राजा’ गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्घटनेनंतर शेलार यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन मृत गणेश सेवकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवसे आणि बृजेश जोशी यांच्या पार्थिवाचे चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यदर्शन घेऊन त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.

दुर्घटनेचे नेमके कारण आणि त्यामागील जबाबदारी चौकशीनंतर स्पष्ट होईल. पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेे. त्यांना निष्पक्षपणे काम करू दिले पाहिजे, असे शेलार यांनी सांगितले. गणेशमूर्ती वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॉलीची चाकांची रचना, लोखंडी भाग आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कंपनांबाबत मंडळांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. गणेशमूर्ती आगमन मार्गांची स्थिती तपासण्याबाबत मुंबई महापालिका आयुक्तांशी चर्चा झाली आहे. रस्त्यांची दुरुस्ती आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गणेश मंडळे, महापालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही गणेश सेवकांना राज्य सरकारच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. शेलार यांनी त्यांच्या कुटुंबीयांना वैयक्तिक पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. जखमींवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना आवश्यक ती सर्व मदत आणि आर्थिक सहाय्य देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.