मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपा नेते, आमदार आशिष शेलार यांच्याविरोधात बुधवारी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पेडणेकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यावर आता आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया देत प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत म्हणून जे मी बोललो नाही ते निर्माण करुन माझ्याविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत असे म्हटले आहे.

“सत्य समोर येईलच. सत्तेचा गैरवापर करुन तुम्ही माझ्याबाबत खोट्या तक्रारी दाखल केल्या असतील. पण माझा सवाल तोच आहे की नायर रुग्णालयामध्ये चार महिन्याचे बालक मृत्यूमुखी का पडले? त्याच्या आई वडिलांचा मृत्यू का झाला? रुग्णांना योग्यवेळेला सेवा सुविधा का नाही मिळाल्या? या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत म्हणून जे मी बोललो नाही ते निर्माण करुन माझ्याविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मी जे बोललो ते आजही फेसबुकवर आहे. तुम्ही खोट्या तक्रारी केल्या असतील पण माझा आवाज तुम्ही दाबू शकणार नाही. सरकारच्या नाकर्तेपणाविरुद्धचा संघर्ष मी अजून कडवा करणार आहे,” असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

“कोस्टल रोडचा भ्रष्टाचार काढला म्हणून खोट्या केसेस करत आहात का? सावरकरांचा अपमान कोणी करु नये म्हणून प्रश्न उपस्थित केला तर धमकावणाऱ्या नोटीस देत आहात का? मी आणि माझे सहकारी याला घाबरणार नाही. हा अहंकार जो ठाकरे सरकारचा आहे त्याविरुद्ध संघर्ष अजून कडवा केला जाईल. पोलिसांनी सत्तेचा दुरुपयोग केला त्याचा मी निषेध करतो,” असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

वरळीच्या बीडीडी चाळीतील दुर्घटनेनंतर आशीष शेलार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. तिथे सिलिंडरचा स्फोट होऊन चार महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आणि पाठोपाठ त्याच्या वडिलांनाही प्राण गमवावे लागले. मुंबईच्या महापौर मात्र ७२ तास उलटल्यानंतर रुग्णालयात पोहोचल्या. याच मुद्द्यावरुन शेलार यांनी महापौरांना लक्ष्य केले होते. नायर रुग्णालयात गेलेल्या जखमींना तब्बल ४५ मिनिटे उपचारांविना तसेच ठेवले गेले. त्यांच्यावर औषधोपचार नाही किंवा विचारपूसही करण्यात आली नाही. या बेफिकिरीमुळे चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला, असे नमूद करत शेलार यांनी महापौरांवर टीका केली होती.